सांगली (महाराष्ट्र) :शक्तिपीठ महामार्ग प्रकल्पामुळे शेती आणि पर्यावरणावर गंभीर परिणाम होणार असल्याचा इशारा देऊन, कोल्हापूर आणि सातारा जिल्ह्यांतील कृष्णा खोऱ्यातील शेतीवर या महामार्गाचा थेट परिणाम होऊन जवळपास २० लाख टन ऊस उत्पादन घटणार असल्याचे मत शेतकरी संघटनेचे नेते व माजी खासदार राजू शेट्टी यांनी व्यक्त केले. पलूस-कडेगाव शक्तिपीठविरोधी संघर्ष समितीच्यावतीने घोगाव (ता. पलूस) येथे सर्वपक्षीय शेतकरी एल्गार मेळावा कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी खासदार विशाल पाटील, आमदार रोहित पवार, आमदार जयंत पाटील, आमदार डॉ. विश्वजित कदम, महेंद्र लाड, किरण लाड, ॲड. दीपक लाड आदी प्रमुख उपस्थित होते.
शेट्टी म्हणाले की, या महामार्गामुळे नैसर्गिक पाण्याच्या प्रवाहात अडथळे निर्माण होऊ शकतात. वारणा नदीसह इतर उपनद्यांच्या प्रवाहावर परिणाम होण्याचीही भीती आहे. पावसाचे पाणी योग्यप्रकारे वाहून जाण्याऐवजी ते साचण्याची शक्यता वाढेल. त्यामुळे पूरस्थिती निर्माण होऊ शकते आणि त्याचा फटका शेतीला बसणार आहे. हा राष्ट्रीय महामार्ग नसून राज्यातील विकास महामंडळामार्फत राबवला जाणारा प्रकल्प आहे. त्यामुळे पारदर्शकतेचा अभाव दिसून येतो. यामागे काही ठरावीक घटकांचा आर्थिक स्वार्थ असल्याची शक्यता नाकारता येत नाही.
याआधी अनेक आमदारांनी या प्रकल्पाला विरोध दर्शवणारी पत्रे दिल्याचा उल्लेख करत त्यांनी सांगितले की, जनतेच्या तीव्र विरोधामुळेच लोकप्रतिनिधींना भूमिका घ्यावी लागली. जर स्थानिक लोकांनी ठाम भूमिका घेतली, तर कोणताही प्रकल्प थांचवता येतो. पलूस, खानापूर, आटपाडी आदी तालुक्यांतील शेतकऱ्यांनी एकजूट दाखवण्याचे आवाहन करत ते म्हणाले, हा लढा केवळ काही गावांचा नाही, तर संपूर्ण भागाच्या भवितव्याचा आहे. शेतकऱ्यांनी एकत्र येऊन या प्रकल्पाविरोधात ठाम भूमिका घ्यावी. प्रास्ताविक ॲड. दीपक लाड यांनी केले. या एल्गार मेळाव्यास शेतकरी नेते संदीप राजोबा, मारुती चव्हाण, रविराज साबळे, ॲड. सुभाष पाटील, पी. जी. पाटील, ॲड. बाबासाहेव मुळीक, सुनील गुरव, शिवाजी वागले आदी उपस्थित होते. आभार रविराज साबळे यांनी मानले.


















