कर्नाटक : मार्कंडेय साखर कारखान्याचे अध्यक्षपद पाच महिने रिक्त, बंद कारखाना सुरू होण्याची शेतकऱ्यांना प्रतीक्षा

बेळगाव : गेल्या दोन वर्षांपासून काकती येथील मार्कंडेय साखर कारखान्याचे गाळप झालेले नाही. कारखाना बंद असल्याने अडचणी वाढल्या आहेत. कारखान्याची निवडणूक होऊन अडीच वर्षांचा कालावधी उलटला आहे. निवडणूक झाल्यानंतर तानाजी पाटील हे अध्यक्ष झाले. त्यानंतर त्यांनी राजीनामा दिला व आर. आय. पाटील यांनी काही महिने अध्यक्षपदाची धुरा सांभाळली. सध्या १५ संचालक आहेत. बसवंत मायाण्णाचे हे उपाध्यक्ष आहेत. कारखान्यासमोरील अडचणींमुळे अध्यक्षपद सांभाळण्यासाठी कोणीही पुढाकार घेण्यास तयार नाही, अशी चर्चा आहे. महिनाभरापूर्वी कारखान्याच्या व्यवस्थापकीय संचालकांनी नोटीस काढून अध्यक्ष निवडीची सूचना केली होती; मात्र त्या बैठकीला कोणीही उपस्थित राहिलेले नव्हते. त्यामुळे कोरम अभावी बैठक रद्द झाली.

सध्या कारखान्याकडून कामगारांचा १५ महिन्यांचा पगारही देण्यात आलेला नाही. उसाचा हंगाम दसऱ्यापासून सुरू होतो. यासाठी अद्याप चार ते पाच महिने बाकी आहेत. यामुळे यंदा तरी हंगाम सुरू होणार का ? असा प्रश्न शेतकऱ्यांतून विचारला जात आहे. कडोलीसह लगतच्या परिसरातून मोठ्या प्रमाणावर ऊस या कारखान्याला जातो. मात्र कारखाना बंद असल्याने हा ऊस अन्यत्र वळवावा लागतो. त्यामुळे शेतकऱ्यांना मोठ्या आर्थिक नुकसानीला सामोरे जावे लागत आहे. अध्यक्षपद गत पाच महिन्यांपासून रिक्तच आहे.अध्यक्षपदाचा तिढा सुटणार कधी, असे अनेक प्रश्न उपस्थित होऊ लागले आहेत.

ChiniMandi WhatsApp Channel
Bioenergy Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here