अहिल्यानगर : स्व. भाऊसाहेब थोरात यांनी सहकाराच्या माध्यमातून विविध संस्थांची उभारणी केली. या संस्था आज केवळ जिल्ह्यालाच नव्हे तर, संपूर्ण राज्याला मार्गदर्शक ठरत आहेत, असे मत अन्न व नागरिक पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी व्यक्त केले. भुजबळ यांनी सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखान्याला सोमवारी सदिच्छा भेट दिली. यावेळी ते बोलत होते. मंत्री भुजबळ यांनी अमृत उद्योग समूहातील विविध संस्थांची माहिती जाणून घेत, सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात यांच्या आठवणींना उजाळा दिला.
सहकारातून साधलेल्या प्रगतीने समाजातील सर्वसामान्य नागरिक व शेतकऱ्यांचे जीवनमान बदलले आहे. याचा स्वानुभव अमृत उद्योग समूहातील सर्व सहकारी संस्थांच्या माध्यमातून येत आहे, असे मत भुजबळ यांनी व्यक्त केले. त्यांनी स्व. भाऊसाहेब थोरात यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून, मंत्री भुजबळ यांनी आदरांजली वाहिली. यावेळी माजी आमदार डॉ. सुधीर तांबे, युवा काँग्रेस तालुकाध्यक्षा डॉ. जयश्री थोरात, दुर्गाताई तांबे, संचालक व कार्यकारी संचालक जगन्नाथ घुगरकर यांनी त्यांचे स्वागत केले.


















