महाराष्ट्र : राज्याचे सीबीजी धोरण जाहीर, साखर कारखाने करणार कचऱ्यापासून इंधननिर्मिती

पुणे : राज्य सरकारने ‘कॉम्प्रेस्ड बायोगॅस (सीबीजी) धोरण २०२६’ जाहीर केले आहे. त्यामुळे प्रेसमड, बगॅस आणि उसाच्या अवशेषांपासून हरित इंधननिर्मितीला चालना मिळणार आहे. तेल कंपन्यांकडून गॅस खरेदीची हमी, जलद मंजुरी प्रक्रिया, विविध प्रोत्साहनपर तरतुदींमुळे साखर उद्योगासाठी अतिरिक्त उत्पन्नाची मोठी संधी निर्माण झाली आहे. ‘सीबीजी’ प्रकल्पासाठी किमान २० टन प्रतिदिन सेंद्रिय कचरा किंवा मिथेनयुक्त जैविक स्रोत उपलब्ध असणे आवश्यक आहे. त्यामुळे लहान साखर कारखान्यांना एकत्रितपणे प्रकल्प उभा करण्याची संधी मिळणार आहे. प्रकल्प क्षमतेनुसार प्रतिटन कमाल ७५ लाख रुपयांपर्यंत निधी देण्यात येणार आहे. एका प्रकल्पासाठी कमाल १५ कोटी रुपयांची मर्यादा निश्चित केली आहे. २०२६-२७ साठी ५०० कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.

राज्य सरकारने या धोरणात कारखान्यांतील उपउत्पादनांचा स्पष्टपणे ‘कच्चा माल’ म्हणून समावेश केला आहे. प्रेसमड, बगॅस आणि उसाचे अवशेष यांचा वापर ‘सीबीजी’ प्रकल्पांसाठी करता येणार आहे. कच्च्या मालाच्या सातत्यपूर्ण पुरवठ्यासाठी कृषी उत्पन्न बाजार समित्या, गोशाळा आणि साखर कारखान्यांसोबत दीर्घकालीन करार करण्यास प्रोत्साहन देण्यात आले आहे. याबाबत शुगर बायोएनर्जी फोरमचे सहअध्यक्ष दिपील पाटील यांनी दैनिक ‘सकाळ’शी बोलताना सांगितले की, या धोरणातून प्रदूषण नियंत्रण, शेतकऱ्यांना अतिरिक्त उत्पन्न आणि हरित ऊर्जानिर्मिती या तिन्ही उद्दिष्टांचा मेळ साधला आहे. आर्थिक प्रोत्साहन, सुलभ मंजुरी प्रक्रिया आणि संस्थात्मक पाठबळामुळे राज्यातील जैवऊर्जा परिसंस्थेला बळकटी मिळेल. विशेषतः कृषी व साखर उद्योगप्रधान भागांमध्ये या धोरणाचा सकारात्मक परिणाम होईल.

ChiniMandi WhatsApp Channel
Bioenergy Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here