पुणे : राज्यातील साखर कारखाने ऊसाचा कमी साखर उतारा दाखवून प्रत्येक गाळप हंगामात सरासरी नऊ हजार कोटी रुपयांची साखर चोरी करत असल्याचा गंभीर आरोप शेतकरी संघटनेचे अध्यक्ष रघुनाथदादा पाटील यांनी केला आहे. महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या शास्त्रीय अभ्यासाचा दाखला देत त्यांनी हा दावा केला. शेतकरी संघटनेने पाडेगाव येथील मध्यवर्ती ऊस संशोधन केंद्राकडून ऊस उताऱ्याबाबत माहिती मागवली होती. संशोधन केंद्राने दिलेल्या माहितीनुसार, ‘को ८६०३२’ आणि ‘को-एम २६५’ या ऊस जातींपासून मिळणाऱ्या साखर उताऱ्याचा तपशील स्पष्ट करण्यात आला आहे. सर्वाधिक लागवड होणाऱ्या ‘को ८६०३२’ या जातीच्या १२ महिन्यांच्या उसातून १३.५९ टक्के, तर १४ महिन्यांच्या उसातून तब्बल १५.७५ टक्के साखर उतारा मिळत असल्याचे संशोधनात नमूद करण्यात आले आहे.
यावरून पाटील यांनी सवाल उपस्थित करत म्हटले की, सरकारी संशोधन केंद्राच्या उसाला १५ टक्क्यांहून अधिक उतारा मिळतो, मात्र साखर कारखाने शेतकऱ्यांच्या उसाचा उतारा नेहमीच कमी दाखवतात. राज्य सरकारही या प्रकाराकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असल्याचा आरोप त्यांनी केला.पाटील म्हणाले, “प्रतिटन उसातून साधारण १५० किलो साखर मिळते. मात्र कारखाने १० ते १२ टक्के खोटा उतारा दाखवून केवळ १२० किलो साखर मिळाल्याचे भासवतात. उर्वरित ३० किलो साखर काळ्या बाजारात विकली जाते. साखरेचा दर प्रतिकिलो ४० रुपये धरल्यास प्रतिटनामागे सुमारे १२०० रुपयांची साखर चोरी होते.”
गेल्या गाळप हंगामात राज्यात सुमारे ८ कोटी टन ऊस गाळपासाठी वापरण्यात आला. त्यामुळे या कथित उतारा चोरीमुळे शेतकऱ्यांची नऊ हजार कोटी रुपयांहून अधिक रकमेची लूट झाल्याचा दावा त्यांनी केला. उतारा चोरी रोखण्यासाठी नव्या ऊस नियंत्रण आदेशात कोणतीही प्रभावी तरतूद नसल्याने कारखान्यांना हे प्रकार सुरू ठेवणे सोपे झाल्याचेही त्यांनी म्हटले.
हवाई अंतराची अट रद्द करण्याची मागणी
दोन साखर कारखान्यांमधील हवाई अंतराची अट हीच साखर उद्योगातील भ्रष्टाचाराचे मूळ असल्याचा आरोप करत पाटील यांनी ही अट रद्द करण्याची मागणी केली. त्यांच्या मते, ही अट हटवल्यास शेतकरी आणि नवउद्योजक स्वतःचे छोटे साखर कारखाने उभारू शकतील आणि उद्योगात स्पर्धा वाढेल. शेतकरी संघटनाही कमी भांडवलात स्वतःचा कारखाना सुरू करू शकेल, असा दावा त्यांनी केला.


















