सातारा : श्रीराम सहकारी साखर कारखाना यांच्या वतीने आज, दि. १८ मे रोजी दुपारी १ वाजता विशेष सर्वसाधारण सभेचे आयोजन करण्यात आले असून कारखान्याच्या भवितव्याशी संबंधित महत्त्वाच्या विषयांवर या सभेत निर्णय घेतले जाणार आहेत. कारखान्याचे चेअरमन डॉ. बाळासाहेब शेंडे यांच्या अध्यक्षतेखाली सभा पार पडणार असल्याची माहिती प्रशासनाने दिली आहे. सभेमध्ये कल्लाप्पाणा आवाडे जवाहर शेतकरी सहकारी साखर कारखाना लिमिटेड यांच्यासोबत १ मार्च २०२२ रोजी करण्यात आलेला भागीदारी करार रद्द करण्याबाबत चर्चा करून निर्णय घेतला जाणार आहे. त्यामुळे या सभेकडे कारखान्याच्या सभासदांचे विशेष लक्ष लागले आहे. तसेच महाराष्ट्र शासनाच्या ८ जानेवारी २०२० च्या शासन निर्णयानुसार ‘एक्स्प्रेशन ऑफ इंटरेस्ट’ प्रक्रियेद्वारे कारखाना, अर्कशाळा तसेच देशी-विदेशी मद्य विभाग सहकारी
सभेत किंवा खासगी तत्त्वावर चालवण्याबाबतही विचारविनिमय होणार आहे. कारखान्याचे कार्यकारी संचालक चंद्रकांत तळेकर यांनी सर्व सभासदांना उपस्थित राहण्याचे आवाहन केले आहे. सभासद असलेल्या प्रत्येक सहकारी संस्थेने सभेसाठी अधिकृत प्रतिनिधीचे नाव पंचकमिटीकडे लेखी स्वरूपात १५ मेपर्यंत कळवण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या. दरम्यान, ही सभा केवळ सभासदांसाठी मर्यादित ठेवण्यात आली असून सभासदांव्यतिरिक्त इतर कोणालाही प्रवेश दिला जाणार नसल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे. कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी यासाठी पोलिस बंदोबस्ताची मागणी करण्यात आली आहे. विशेष सूचनेनुसार, गणपूर्तीअभावी सभा तहकूब झाल्यास त्याच दिवशी अर्ध्या तासाने त्याच ठिकाणी पुन्हा सभा घेण्यात येणार असून त्यावेळी गणपूर्तीची आवश्यकता राहणार नसल्याचे नोटिशीत नमूद करण्यात आले आहे.


















