टीईपीए अंतर्गत हरित ऊर्जा, सागरी उद्योग आणि फिनटेक क्षेत्रात भारत-नॉर्वे सहकार्य अधिक मजबूत होणार : ईवाय अहवाल

नवी दिल्ली : भारत आणि नॉर्वे यांच्यात भारत-ईएफटीए व्यापार आणि आर्थिक भागीदारी करार (टीईपीए) अंतर्गत हरित ऊर्जा, सागरी उद्योग, डिजिटल पायाभूत सुविधा आणि वित्तीय तंत्रज्ञान क्षेत्रातील सहकार्य अधिक मजबूत करण्याची तयारी सुरू आहे. ‘ईवाय’च्या ताज्या अहवालानुसार, या कराराअंतर्गत पुढील १५ वर्षांत भारतात १०० अब्ज अमेरिकी डॉलरची गुंतवणूक आणि १० लाख थेट रोजगारनिर्मितीचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. “इंडिया-नॉर्वे पार्टनरशिप : एक्सप्लोरिंग ऑपर्च्युनिटीज, इमर्जिंग प्रायोरिटीज अँड पॉलिसी डायरेक्शन्स” या शीर्षकाच्या अहवालात म्हटले आहे की, हा करार पारंपरिक व्यापारापासून दीर्घकालीन आर्थिक एकात्मतेकडे जाणारा महत्त्वाचा टप्पा आहे. नॉर्वेची भांडवली क्षमता आणि प्रगत तंत्रज्ञान भारताच्या वेगवान आर्थिक वाढी आणि उत्पादन क्षेत्रातील महत्त्वाकांक्षांशी जोडले जाणार आहे.

ओस्लो येथे आयोजित इंडिया-नॉर्डिक परिषदेदरम्यान हा अहवाल प्रसिद्ध करण्यात आला. अहवालात नमूद करण्यात आले आहे की, दोन्ही देशांमध्ये ऑफशोअर पवन ऊर्जा, हायड्रोजन, स्वयंचलित जहाज वाहतूक, मत्स्यपालन, हरित डेटा सेंटर आणि डिजिटल पायाभूत सुविधा यांसारख्या क्षेत्रांमध्ये मोठ्या प्रमाणावर सहकार्याच्या संधी उपलब्ध आहेत. मार्च २०२४ मध्ये स्वाक्षरी झालेला आणि ऑक्टोबर २०२५ पासून लागू होणारा टीईपीए करार दोन्ही देशांतील सहकार्य अधिक दृढ करण्यासाठी व्यापक चौकट उपलब्ध करून देतो, असे अहवालात नमूद करण्यात आले आहे. अहवालानुसार, भारताची मजबूत आर्थिक पायाभूत स्थिती त्याला दीर्घकालीन गुंतवणुकीसाठी आकर्षक ठिकाण बनवते. सध्या सुमारे ३.९ ट्रिलियन डॉलर जीडीपीसह भारत जगातील सहाव्या क्रमांकाची अर्थव्यवस्था असून २०३० पर्यंत तिसऱ्या क्रमांकाची अर्थव्यवस्था होण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.

ChiniMandi WhatsApp Channel

ऊर्जा, सागरी उद्योग, शाश्वत तंत्रज्ञान आणि जागतिक गुंतवणूक या क्षेत्रांतील नॉर्वेची ताकद भारताच्या विकास प्रवासाला पूरक ठरू शकते, असेही अहवालात म्हटले आहे. हरित ऊर्जा क्षेत्रात ऑफशोअर पवन ऊर्जा, कार्बन कॅप्चर आणि कमी-कार्बन तेल व वायू तंत्रज्ञानामधील नॉर्वेचे कौशल्य भारताच्या ऊर्जा सुरक्षा आणि स्वच्छ ऊर्जा धोरणांशी सुसंगत असल्याचे नमूद करण्यात आले आहे. सागरी आणि जहाजवाहतूक क्षेत्रात नॉर्वेच्या स्वयंचलित जहाज तंत्रज्ञानाला भारताच्या जहाजबांधणी आणि बंदर पायाभूत सुविधांची जोड मिळू शकते. तसेच मत्स्यपालन आणि समुद्री अन्न क्षेत्रात नॉर्वेची आधुनिक कोल्ड-चेन तंत्रज्ञान आणि मत्स्यपालन कौशल्य भारतातील मोठ्या मत्स्य व्यवसायाशी जोडले जाऊ शकते.

डिजिटल अर्थव्यवस्थेमध्ये कृत्रिम बुद्धिमत्ता आधारित तंत्रज्ञान, शाश्वत डेटा सेंटर आणि डिजिटल पायाभूत सुविधांमध्येही सहकार्याच्या मोठ्या संधी असल्याचे अहवालात नमूद करण्यात आले आहे. ईवाय इंडियाचे भागीदार बिपिन सप्रा यांनी सांगितले की, भारत आता नॉर्वेसारख्या तांत्रिकदृष्ट्या प्रगत देशांकडून धोरणात्मक परकीय गुंतवणूक आकर्षित करण्यावर भर देत आहे. तर, अश्विन विश्वनाथन यांनी म्हटले की, टीईपीीए करारामुळे दोन्ही देशांमधील आर्थिक संबंधांना नवी गती मिळेल. अहवालाच्या निष्कर्षानुसार, मजबूत धोरणात्मक समर्थन, गुंतवणूक आराखडा आणि विविध क्षेत्रांतील परस्परपूरक क्षमता यामुळे भारत-नॉर्वे भागीदारी दीर्घकालीन गुंतवणूक, नवकल्पना आणि आर्थिक विकासासाठी अधिक सक्षम होणार आहे.

Bioenergy Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here