नवी दिल्ली : एल निनोचा वाढता प्रभाव आणि होर्मुझ सामुद्रधुनीतील संभाव्य अडथळ्यांमुळे जागतिक अन्नमहागाईत मोठी वाढ होऊ शकते, असा इशारा सिटी रिसर्चच्या नव्या अहवालात देण्यात आला आहे. पुढील 6 ते 12 महिन्यांत कृषी वस्तूंच्या किमतींवर मोठा दबाव निर्माण होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. अहवालानुसार, कृषी बाजारपेठ सध्या पुरवठा साखळीतील अडचणी, वाढते ऊर्जा दर, खतांची कमतरता आणि एल निनोमुळे निर्माण होणाऱ्या प्रतिकूल हवामानामुळे धोक्यात आली आहे. ‘सिटी रिसर्च’च्या कमोडिटी आउटलुक अहवालात म्हटले आहे की, जर होर्मुझ सामुद्रधुनी दीर्घकाळ बंद राहिली तर जागतिक कृषी उत्पादन खर्चात मोठी वाढ होऊ शकते. ऊर्जा दर वाढल्यामुळे आणि खतांचा तुटवडा निर्माण झाल्यामुळे शेतीचा खर्च अधिक वाढेल.
अहवालात पुढे म्हटले आहे की, तेलावर आधारित बुरशीनाशके आणि कीटकनाशकांचा पुरवठा कमी झाल्यास पिकांचे संरक्षण कमी होईल, ज्यामुळे उत्पादन आणि उत्पादकतेवर परिणाम होऊ शकतो. तज्ज्ञांच्या मते, जीवाश्म इंधनांच्या वाढत्या किमतींमुळे कृषी उत्पादनांचा बायोफ्यूलसाठी अधिक वापर होऊ शकतो. त्यामुळे अन्नधान्यांच्या किमतींमध्ये आणखी वाढ होण्याची शक्यता आहे. सिटी रिसर्चच्या माहितीनुसार, यंदा कृषी वस्तूंच्या किमतींमध्ये आधीच वाढ सुरू झाली आहे. मे महिन्याच्या मध्यापर्यंत जागतिक कृषी वस्तूंच्या किमतींमध्ये सुमारे 13 टक्क्यांची वाढ नोंदवली गेली आहे.
अहवालात साखर, कोको आणि कॉफी या पिकांना एल निनो आणि ऊर्जा संकटाचा सर्वाधिक फटका बसू शकतो, असे सांगण्यात आले आहे. एल निनोमुळे आशियातील अनेक भागांमध्ये तापमान वाढ आणि कमी पाऊस होण्याची शक्यता असून त्यामुळे पिकांचे उत्पादन घटू शकते. याशिवाय, यंदा एप्रिलपर्यंत जागतिक अन्न निर्देशांकात सुमारे 5 टक्क्यांची वाढ झाली असून जागतिक अन्नमहागाईचा दबाव वाढत असल्याचे संकेत मिळत आहेत. हा अहवाल अशा वेळी समोर आला आहे, जेव्हा मध्य पूर्वेतील तणाव आणि जागतिक पुरवठा साखळीतील अडचणींमुळे ऊर्जा आणि अन्न बाजारपेठेत अस्थिरता कायम आहे.


















