भटिंडा : पंजाबमध्ये गहू पेरणीचा अनुकूल कालावधी वेगाने संपत असून, राज्यातील जवळपास निम्म्या क्षेत्रात अद्याप पेरणी बाकी आहे. त्यामुळे वेळेत पेरणी पूर्ण करण्यासाठी शेतकरी भात पिकाचे अवशेष आणि पराली हटविण्याच्या कामाला लागले आहेत. शेत लवकर रिकामे करण्याच्या घाईमुळे पीक अवशेष व्यवस्थापन (CRM) यंत्रांची मागणी वाढली आहे. मात्र, अनेक शेतकऱ्यांना ही यंत्रे उपलब्ध होत नसल्याने ते पराली जाळण्याचा मार्ग अवलंबत आहेत. परिणामी, गेल्या काही दिवसांत शेतांमध्ये आग लावण्याच्या घटनांमध्ये मोठी वाढ झाल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे.
साधारणपणे १५ ते २० नोव्हेंबर हा गहू पेरणीसाठी सर्वाधिक अनुकूल कालावधी मानला जातो. या काळातील तापमान गव्हाच्या पिकाला सुरुवातीच्या अवस्थेत फुटवे येण्यासाठी पोषक असते. दरम्यान, आगामी काही महिन्यांत एल निनोचा प्रभाव वाढण्याची शक्यता असल्याने कृषी तज्ज्ञांनीही चिंता व्यक्त केली आहे.
जागतिक हवामान संघटनेच्या (WMO) अंदाजानुसार, डिसेंबरच्या आसपास एल निनोचा प्रभाव सर्वोच्च पातळीवर पोहोचू शकतो आणि फेब्रुवारी २०२७ पर्यंत कायम राहण्याची शक्यता आहे. यामुळे हिवाळ्यात तापमान सामान्यपेक्षा अधिक राहण्यासह हवामान कोरडे होऊ शकते. परिणामी, जमिनीतील ओलावा कमी होऊन गव्हाच्या वाढीसाठी आवश्यक तापमान परिस्थितीवर परिणाम होण्याची शक्यता आहे. विशेषतः दाणे भरण्याच्या अवस्थेत वाढलेल्या तापमानामुळे पिकावर उष्णतेचा ताण येण्याचा धोका आहे.
कृषी तज्ज्ञांच्या मते, गव्हाच्या पेरणीसाठी शेत लवकर मोकळे करण्याच्या प्रयत्नांतूनच अलीकडे पराली जाळण्याच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. दिवाळीच्या दिवशी या घटनांनी उच्चांक गाठला. त्या दिवशी पंजाबमध्ये एकाच दिवसात पराली जाळण्याच्या १,१५२ घटना नोंदवण्यात आल्या. राज्यात भात कापणीचे ९५ टक्क्यांहून अधिक काम पूर्ण झाले असले, तरी गव्हाची पेरणी पूर्ण होण्यासाठी आणखी सुमारे दोन आठवडे लागण्याचा तज्ज्ञांचा अंदाज आहे. त्यामुळे बहुतांश शेतांमध्ये नवीन पिकाची पेरणी होईपर्यंत पराली जाळण्याच्या घटना सुरू राहण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
पंजाबचे कृषी संचालक गुरजीत सिंह ब्रार यांनी सांगितले की, “भात कापणीचे काम जवळपास पूर्ण झाले असून, गव्हाची पेरणी ५० टक्क्यांचा टप्पा ओलांडून पुढे गेली आहे. पंजाब कृषी विद्यापीठातील तज्ज्ञांच्या मते, नोव्हेंबरच्या तिसऱ्या आठवड्यापर्यंत पेरणी झालेल्या गव्हाची वाढ व्यवस्थित होते. त्यामुळे २० ते २२ नोव्हेंबरपर्यंत पेरणीचे काम पूर्ण होईल, अशी अपेक्षा आहे. ”पीक अवशेष व्यवस्थापनाला प्रोत्साहन देण्यासाठी कृषी विभागाकडून सातत्याने प्रयत्न केले जात असल्याचेही त्यांनी सांगितले.
शेतांमध्ये योग्य ओलावा नसल्याने पेरणीला अडथळा
पंजाबमधील अनेक भागांत गहू पेरणीसाठी आवश्यक असलेली जमिनीतील ओलाव्याची योग्य स्थिती (वत्तर) उपलब्ध नसणे, हेही शेतकऱ्यांसमोरील मोठे आव्हान ठरत आहे. वत्तर म्हणजे जमिनीत असलेला ओलाव्याचा संतुलित स्तर. जमीन अतिशय ओली किंवा कोरडी नसून योग्य प्रमाणात ओलसर असणे आवश्यक असते. गव्हाच्या बियाण्यांचे चांगले अंकुरण आणि एकसमान उगवण होण्यासाठी ही स्थिती महत्त्वाची असते.
शेतकरी मागील पिकाची कापणी झाल्यानंतर साधारणपणे शेतात पाणी देतात आणि जमिनीत योग्य ओलावा निर्माण होण्याची वाट पाहतात. त्यानंतर मशागत करून गव्हाची पेरणी केली जाते. जमिनीत वत्तर योग्य असल्यास माती भुसभुशीत होते आणि मशागतीसाठी अनुकूल स्थिती निर्माण होते. अशा वेळी मातीचे मोठे ढेकळ तयार होत नाहीत आणि माती शेतीच्या अवजारांना चिकटतही नाही. कृषी विभागाच्या एका अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, गव्हाचे बियाणे साधारणपणे ४ ते ५ सेंटीमीटर खोलीवर पेरले जाते. दोन ओळींमधील अंतर २० ते २२ सेंटीमीटर ठेवले जाते. त्यामुळे पिकाच्या मुळांची चांगली वाढ होण्यास आणि पुरेशा प्रमाणात फुटवे येण्यास मदत होते.


















