सातारा : रेठरे बुद्रुक येथील यशवंतराव मोहिते कृष्णा सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीसाठी उद्यापासून (मंगळवार) रस्सीखेच सुरू होणार आहे. निवडणुकीच्या रिंगणातून कोण माघार घेणार? याची उत्सुकता आहे. त्यासाठी कोण कशी फिल्डिंग लावणार ? यावर लढती अवलंबून आहे. निवडणुकीसाठी दाखल अर्जांपैकी सहा अर्जांवर हरकती घेण्यात आल्या. त्यावरील सुनावणीचा निकाल आज, मंगळवारी दिला जाणार आहे. दाखल १३९ पैकी १२ अर्ज दुबार निघाले. आता वैध उमेदवारांची यादी आज, मंगळवारी जाहीर केली जाईल. नऊ जूनअखेर अर्ज मागे घेण्याची मुदत असल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी अपर्णा यादव यांनी दिली.
निवडणुकीसाठी दाखलपैकी सहा अर्जावर हरकती आल्या. उमा अजितकुमार देसाई, अविनाश किसन पाटील, संजय मोहन जगताप, सुरेश गणपती पाटील, सुरेश संभाजी पाटील, संतोष बबन जाधव यांच्या अर्जावर हरकत घेण्यात आली. दाखल १३९ अर्जांमध्ये सर्वाधिक अर्ज कऱ्हाड व वाळवा तालुक्यांतून आहेत. अर्जांच्या छाननीमध्ये १२ अर्ज दुबार असल्याचे समोर आले. दुबार अर्ज अवैध होणार आहेत. मात्र, त्याची अधिकृत घोषणा आज होईल, अशी माहिती सूत्रांनी दिली.


















