पुणे : सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या नुकत्याच झालेल्या पंचवार्षिक निवडणुकीत सुनेत्रा पवार यांच्या नेतृत्वाखालील पॅनेलने सर्व २१ जागा जिंकत निर्विवाद वर्चस्व मिळवले होते. त्यामुळे अध्यक्षपदाची धुरा कोणाकडे जाणार, याविषयी उत्सुकता होती. अखेर अध्यक्षपदासाठी अनुभवी राजवर्धन शिंदे यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाले. निवडणूक निर्णय अधिकारी दिग्विजय आहेर यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत उपाध्यक्षपदी संग्राम सोरटे यांची बिनविरोध निवड झाली आहे. गुरुवारी निवडीची प्रक्रिया पूर्ण झाली.
राजवर्धन शिंदे यांची अध्यक्षपदी निवड होण्याची ही तिसरी वेळ आहे. यापूर्वी त्यांनी दुष्काळी परिस्थितीतही कारखान्याचे नेतृत्व केले होते. उपाध्यक्षपदी निवड झालेले संग्राम सोरटे हे यापूर्वी दोन वेळा संचालक म्हणून कार्यरत होते. निवडीनंतर जय पवार यांनी कारखान्याला भेट देऊन नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन केले. कारखान्याच्या संचालक मंडळाशी संवाद साधला. पक्षाने आणि सुनेत्रा पवार यांनी सोपवलेली जबाबदारी यशस्वीपणे पार पाडू, असा विश्वास नवनिर्वाचित अध्यक्ष राजवर्धन शिंदे यांनी व्यक्त केला. यावेळी जय पवार म्हणाले की, अजितदादांनी जिवापाड जपलेला, आपल्या कष्टातून उभा केलेला आणि शेतकऱ्यांचे हित केंद्रस्थानी ठेवलेला सोमेश्वर कारखाना हा सहकार क्षेत्रातील महत्त्वाचा आहे. त्यांचा हा समृद्ध वारसा अधिक सक्षमपणे पुढे नेणे ही आपल्या सर्वांची सामूहिक जबाबदारी आहे.


















