सोलापूर : धोत्री येथील गोकुळ शुगर इंडस्ट्रीज कारखान्याच्या थकीत ऊस बिलप्रश्नी जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी बेमुदत ठिय्या आंदोलन सुरू केले आहे. शुक्रवारी आंदोलनाचा पाचवा दिवस होता. आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांना पाठिंबा देण्यासाठी महाविकास आघाडीच्या लोकप्रतिनिधींनी हजेरी लावत आंदोलनात सक्रिय सहभाग घेतला. याशिवाय, रयत क्रांती संघटनेचे पश्चिम महाराष्ट्र युवक प्रदेशाध्यक्ष अमोल वेदपाठक, ऊसदर नियंत्रण समितीचे सदस्य प्रा सुहास पाटील, जिल्हाध्यक्ष नामदेव पवार यांनी पाठिंब्यचे पत्र दिले.
सकाळी उद्धवसेनेचे उमरगा मतदार संघाचे आमदार प्रवीण स्वामी यांनी आंदोलकांची भेट घेतली. यावेळी आ. प्रवीण स्वामी यांनी गोकुळचे चेअरमन दत्ता शिंदे यांच्याशी फोनद्वारे संपर्क साधला. शेतकऱ्यांच्या रकमा तातडीने अदा करण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या. दुपारी धाराशिवचे आमदार कैलास पाटील यांनी संघर्ष समितीच्या पदाधिकाऱ्यांची आणि शेतकऱ्यांची भेट घेतली. शेतकऱ्यांचे गाऱ्हाणे ऐकून घेतले. आंदोलनस्थळीच प्रांताधिकारी सुमित शिंदे, साखर सहसंचालक कार्यालयातील अधिकारी गावडे, निंबर्गी, नायब तहसीलदार भंडारे यांना चर्चेसाठी बोलावले आहे. मात्र सत्ताधारी महायुतीच्या लोकप्रतिनिधींनी या शेतकरी आंदोलनाकडे पाठ फिरवल्याचे दिसून आले. यामुळे या आंदोलनाला राजकीय वळण लागल्याचे चित्र पुढे आले.


















