नवी दिल्ली : हिरो मोटोकॉर्पच्यावतीने पहिली फ्लेक्स-फ्यूएल बाइक लाँच करण्यात येत आहे. या नवीन मोटरसायकलचे नाव, इंजिनची वैशिष्ट्ये आणि इतर तांत्रिक तपशील अद्याप जाहीर करण्यात आलेले नाहीत, परंतु ही बाईक कंपनीच्या लोकप्रिय एचएफ डिलक्स किंवा सर्वाधिक विकल्या जाणाऱ्या स्प्लेंडरवर आधारित असू शकते. केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी, तसेच केंद्रीय पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्री हरदीप सिंग पुरी हे लाँच सोहळ्याला उपस्थित राहणार आहेत. हे लाँच कंपनीच्या इतिहासातील एक महत्त्वपूर्ण टप्पा ठरेल. या फ्लेक्स-फ्यूएल बाईकचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे ती ई २० ते ई १०० पर्यंतच्या इथेनॉल-मिश्रित इंधनांवर चालण्याची क्षमता असेल. हिरो आपले फ्लेक्स-फ्यूएल तंत्रज्ञान एचएफ डिलक्समध्ये आणेल की स्प्लेंडरमध्ये याबाबत कंपनीने अद्याप अधिकृत माहिती दिलेली नाही. फ्लेक्स-फ्यूएल तंत्रज्ञानासाठी अतिरिक्त हार्डवेअर, अभियांत्रिकी बदलांची आवश्यकता असते. त्यामुळे, बाईकची किंमत स्टँडर्ड पेट्रोल मॉडेलपेक्षा जास्त असू शकते.
जानेवारी २०२५ मध्ये झालेल्या भारत मोबिलिटी एक्स्पो दरम्यान, हिरो मोटोकॉर्पने एचएफ डिलक्स फ्लेक्स-फ्यूएलचे एक प्रोटोटाइप मॉडेल प्रदर्शित केले होते. त्यामुळेच कंपनी एचएफ डिलक्सची फ्लेक्स-फ्यूएल आवृत्ती लॉन्च करेल अशी अपेक्षा आहे. स्प्लेंडर ही भारतातील सर्वाधिक विकल्या जाणाऱ्या मोटरसायकलपैकी एक आहे. या कारणास्तव, तज्ञांचा असा विश्वास आहे की, हिरो आपल्या फ्लेक्स-फ्यूएल मोहिमेला पुढे नेण्यासाठी स्प्लेंडर फ्लेक्स फ्यूएल लॉन्च करू शकते. फ्लेक्स-फ्यूएल बाईकचे डिझाइन सध्याच्या मॉडेलसारखेच राहण्याची शक्यता आहे, परंतु इथेनॉल-आधारित इंधन हाताळण्यासाठी इंजिन आणि इंधन प्रणालीमध्ये अनेक महत्त्वपूर्ण बदल केले जाऊ शकतात. इथेनॉलचे गुणधर्म पेट्रोलपेक्षा वेगळे असतात. त्यामुळे बाईकमध्ये विशेष फ्यूएल लाईन्स आणि सील्स वापरल्या जातील, जे इथेनॉलच्या परिणामांना तोंड देऊ शकतील. याशिवाय, फ्यूएल इंजेक्टर, फ्यूएल पंप आणि इंजिनचे काही घटक देखील अपग्रेड केले जाऊ शकतात. वेगवेगळ्या इथेनॉल मिश्रणांसाठी इंजिनची कार्यक्षमता ऑप्टिमाइझ करण्यासाठी ईसीयू मॅपिंगमध्येही बदल होण्याची शक्यता आहे. अहवालानुसार, याची किंमत सध्याच्या मॉडेलपेक्षा सुमारे पाच ते १० हजारांपर्यंत जास्त असू शकते.


















