अहिल्यानगर : ज्ञानेश्वरसह मुळा कारखान्याची निवडणूक बिनविरोध करण्यासाठी जोरदार प्रयत्न

नेवासे : अहिल्यानगर जिल्ह्यातील मुळा आणि ज्ञानेश्वर या दोन्ही सहकारी साखर कारखान्यांच्या निवडणुकीची रणधुमाळी अंतिम टप्प्यात आहे. भेंडा येथील लोकनेते मारुतराव घुले पाटील ज्ञानेश्वर कारखान्याच्या २१ जागेसाठी चक्क २४० उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत. मात्र कारखान्याचे मार्गदर्शक डॉ. नरेंद्र घुले पाटील आणि माजी आमदार चंद्रशेखर घुले पाटील यांनी निवडणूक बिनविरोध व्हावी यासाठी जोरदार प्रयत्न चालवले आहेत. मुळा कारखान्यातही अशीच स्थिती आहे. या कारखान्याच्या निवडणुकीसाठी संचालक मंडळाच्या २१ जागांसाठी ९४ अर्ज दाखल आहेत. यामध्ये सत्तारुढ माजी आमदार शंकरराव गडाख गटाचे वर्चस्व सिद्ध झाले आहे. दाखल झालेल्या ९४ अर्जांपैकी फक्त १३ अर्ज विरोधी गटाचे असून गडाख गटाचे ८१ अर्ज आहेत. त्यामुळे या निवडणुका बिनविरोध होण्याच्या मार्गावर आहेत.

मुळा कारखान्याच्या संचालक मंडळ निवडणुकीत विरोधी गटाला अनेक ठिकाणी उमेदवारच न मिळाल्यामुळे अनेक जागा बिनविरोध होण्याची शक्यता निर्माण झाली. विशेषतः सोसायटी, ओबीसी, अनुसूचित जाती आणि घोडेगाव गटातील जागांवर गडाख गटाचा मार्ग सुकर झाला आहे. आता माघारीनंतर हे अंतिम चित्र स्पष्ट होईल. तर ज्ञानेश्वर कारखान्याच्या निवडणुकीसाठी मार्गदर्शक डॉ. नरेंद्र घुले पाटील आणि माजी आमदार चंद्रशेखर घुले पाटील यांनी बिनविरोधचे प्रयत्न चालवले आहेत. त्यांच्या शब्दाला मान देत ही निवडणूक बिनविरोध होण्याच्याच मार्गावर असल्याचे वृत्त आहे. तशा हालचाली दिसून येत आहेत. सहकाराच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवणाऱ्या या ऐतिहासिक नगर जिल्ह्यात सहकार चळवळीत राजकारण बाजूला सारून कामधेनू टिकविण्यासाठी राजकारण विरहित प्रयत्न होत असल्यामुळे मुळा आणि ज्ञानेश्वर कारखान्याची निवडणूक न होता बिनविरोध करण्यासाठी यशस्वी प्रयत्न होतांना दिसून येत आहेत.

ChiniMandi WhatsApp Channel
Bioenergy Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here