सातारा : सहकार चळवळ मजबूत करण्यासाठी पक्षीय मतभेद बाजूला ठेवून एकत्र येण्याची गरज आहे. सहकारी संस्था टिकल्या तर शेतकऱ्यांची प्रतिष्ठा आणि ग्रामीण अर्थव्यवस्था अधिक सक्षम होईल. यासाठी यशवंतराव मोहिते कृष्णा सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत जयवंतराव भोसले सहकार पॅनेलला रयत संघटना पाठबळ देईल, अशी घोषणा संघटनेचे नेते अॅड. उदयसिंह पाटील-उंडाळकर यांनी केली. कार्वे येथे आयोजित रयत संघटनेच्या मेळाव्यात ते बोलत होते. कार्पोरेट क्षेत्राशी स्पर्धा करताना सहकार चळवळ टिकविण्यासाठी सर्व घटकांनी एकत्रितपणे काम करणे आवश्यक आहे, असे ते म्हणाले.
यावेळी कृष्णा कारखान्याचे अध्यक्ष डॉ. सुरेश भोसले म्हणाले की, चांगल्या चालणाऱ्या सहकारी संस्था टिकवण्यासाठी संघर्षाऐवजी एकीची भूमिका आवश्यक आहे. सभासदांनी विरोधकांच्या भूलथापांना बळी पडू नये. सहकाराच्या विचारातून या भागात मोठी विकासकामे झाल्याचे सांगितले. यावेळी प्रा. धनाजी काटकर, डॉ. सुधीर जगताप यांचे भाषण झाले. मेळाव्यास रयत संघटनेचे पदाधिकारी, कार्यकर्ते, सभासद आणि सहकार पॅनलचे उमेदवार मोठ्या संख्येने उपस्थित होते.


















