सांगली : बामणी येथील उदगिरी शुगर कारखान्याचे मार्गदर्शक, ज्येष्ठ नेते माजी आमदार मोहनराव कदम आणि कारखान्याचे संस्थापक डॉ. शिवाजीराव कदम यांचा वाढदिवस कारखाना कार्यस्थळावर विविध उपक्रमांनी साजरा करण्यात आला. या अंतर्गत भारती ब्लड बँक, सांगलीच्या सहकार्याने आयोजित शिबिरात ११३ दात्यांनी रक्तदान केले. कारखान्याचे पूर्ण वेळ संचालक सूर्यकांत पाटील यांनी ही माहिती दिली. दरम्यान, यावर्षी १०० वृक्षांची लागवड करण्यात आली.
पर्यावरण रक्षण आणि संवर्धनाचा वसा जपणाऱ्या मोहनराव कदम व डॉ. शिवाजीराव कदम यांच्या मार्गदर्शनाखाली यापूर्वीच कारखाना कार्यस्थळावर १० हजारांहून अधिक फळझाडे, फुले व शोभिवंत झाडांची लागवड करून त्यांचे यशस्वी संगोपन करण्यात आले आहे. कारखाना परिसर, वसाहतीत वृक्षारोपण करण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला आहे. कारखान्याचे चेअरमन डॉ. राहुल कदम यांच्या संकल्पनेतून आयोजित या कार्यक्रमांतर्गत वृक्षारोपण आणि रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले.


















