अहिल्यानगर : श्रीगोंदा तालुक्यात गेल्या काही दिवसांपासून कुठेही अजिबात दमदार पाऊस झाला नाही. त्यामुळे पावसाळ्यात उसाचे पिक वाळत आहे. त्यामुळे तालुक्यातील तीन साखर कारखान्यांचा गाळप हंगाम धोक्यात येण्याची चिन्हे निर्माण झाली आहेत. यावर्षी कुकडीचे उन्हाळी आवर्तन उशिरा सुटले. पिकांना पाणी मिळाले नाही. त्यामुळे कुकडी लाभक्षेत्रातील उसाचे मळे आताच पांढरे झाले आहेत. घोड पट्टयात ऊस हिरवा दिसत असला, तरी पाऊस लांबल्याने घोड पट्ट्यातही धोक्याची घंटा वाजली आहे. तालुक्यात आजघडीला १० ते १२ लाख मेट्रिक टन ऊस उपलब्ध आहे. त्यामुळे कारखान्यांसमोर ऊस टंचाईचे मोठे संकट समोर उभे राहिले आहे.
एके काळी श्रीगोंदा तालु्क्यात ऊस पिक जा्त होते. त्यामुळे राज्यातील २० साखर कारखान्यांना तालुक्यातून ऊस जात होता. मात्र, सध्या तालुक्यातील उसाचे क्षेत्र घटले आहे. शेजारील दौंड, अंबालिका, पारनेर, बारामती ॲग्रो, भीमाशंकर, विघ्नहर हे साखर कारखाने श्रीगोंद्यातील ऊस नेतात. गेल्या तीन वर्षापासून कुकडी सहकारी साखर कारखाना बंद आहे. यावर्षी कारखाना सुरू करण्यासाठी माजी आमदार राहुल जगताप प्रयत्नशील आहेत. तसेच नागवडे व गौरी शूगरला गाळप हंगाम पूर्ण करण्यासाठी २० लाख मेट्रिक टन उसाची गरज आहे. कुकडी कारखाना सुरू होणार आहे. बाबूराव बोत्रे पाटील यांनी ‘साईकृपा’ कारखाना विकत घेत थेट तीन हजारांपेक्षा अधिक भाव देण्याचे धोरण घेतले. नागवडे कारखानाही चांगला दर देतो. त्यामुळे पुणे, सोलापूर, बीड जिल्ह्यातील ऊस श्रीगोंद्यात येऊ लागला. भावाची स्पर्धा सुरू झाल्याने श्रीगोंद्यातील शेतकऱ्यांना ‘अच्छे दिन’ आले आहेत. मात्र, ऊस पिक वाळत असल्याने साखर कारखानदारांनाही चिंता वाढू लागली आहे.


















