अहिल्यानगर : अहिल्यानगर जिल्ह्यात गाळप हंगाम सुरू होऊन जवळपास एक महिना उलटला असतानाही बहुतांश साखर कारखान्यांनी ऊसदर जाहीर केलेला नाही. त्यामुळे उसाला प्रतिटन ४ हजार रुपये पहिली उचल मिळावी, अशी शेतकऱ्यांची प्रमुख मागणी आहे. या ऊस दरावर तोडगा काढण्यासाठी पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली झालेली दुसरी बैठकही ठोस निर्णयाविना संपली. बैठकीत तोडगा न निघाल्याने ऊस उत्पादक शेतकरी संघटना आक्रमक झाल्या.
जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात शेतकऱ्यांनी जोरदार घोषणाबाजी केली. उद्या सायंकाळपर्यंत ऊसदराचा निर्णय न झाल्यास उसाचे काटे, साखर कारखाने आणि जिल्ह्यातील प्रमुख महामार्ग बंद पाडण्याचा इशारा आंदोलक शेतकऱ्यांनी दिला आहे. तर या पालकमंत्री विखे यांनी साखर कारखान्यांच्या चेअरमनना ऊसदर निश्चित करण्याचे निर्देश दिले आहेत.
साखर कारखानदारांनी जिल्हा बँकेच्या नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांशी चर्चा करून ऊसदर निश्चित केला जाईल, असे सांगितले आहे. साखर कारखाने आर्थिक अडचणीत असल्याचे कारण त्यांनी दिले आहे. तर शेतकरी या विषयावरून आक्रमक होत असल्याचे दिसून येते. दोन दिवसांपूर्वी शेतकऱ्यांनी नगर-मनमाड राष्ट्रीय महामार्गावर दिवसभर रास्ता रोको आंदोलन केले होते. कारखाने आणि प्रशासनाने प्रतिटन ४,००० रुपये पहिली उचल जाहीर न केल्यास आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशाराही देण्यात आला होता. आताची बैठक निष्फळ ठरल्याने ऊसदराचा प्रश्न आणखी चिघळण्याची शक्यता आहे.


















