महाराष्ट्रातील गुंतवणूकदारांना बिहारमधील साखर आणि इथेनॉल उद्योगात गुंतवणुकीसाठी रेड कार्पेट!

पुणे : बिहारचे ऊस उद्योग मंत्री संजय कुमार पासवान यांनी महाराष्ट्रातील उद्योजक आणि गुंतवणूकदारांना बिहारमधील उपलब्ध औद्योगिक संधींचा लाभ घेण्याचे आणि राज्याच्या औद्योगिक विकासात सक्रिय भागीदार होण्याचे आवाहन केले. पुणे येथे आयोजित एका गुंतवणूकदार मेळाव्यात ते बोलत होते. बिहारमध्ये उद्योगांसाठी मुबलक कच्चा माल, पाणी आणि कष्टाळू कामगार उपलब्ध असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. हा मेळावा बिहार सरकार, टू सिग्मा कंपनीचे संचालक चंद्रशेखर ओगले आणि तिरहुत उद्योगचे संचालक कल्पना बाजपेयी व हरेन्द्र कुमार बाजपेयी यांच्या वतीने रेसिडेन्सी क्लब येथे आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमात अरुंधती पुरंदरे यांनी गुंतवणूक विषयावर मार्गदर्शन केले. मानसी नायडू यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले. मेळाव्याच्या शेवटी पं. संजय गरूड यांच्या शास्त्रीय गायनाचा कार्यक्रम सादर करण्यात आला.

इथेनॉल निर्मिती उद्योगातही प्रचंड क्षमता…

ChiniMandi WhatsApp Channel

मंत्री पासवान म्हणाले, मी केवळ बिहारचा प्रतिनिधी नव्हे, तर भारत सरकारचा प्रतिनिधी म्हणून आलो आहे. महाराष्ट्राने उद्योग जगतात देशात आणि परदेशात नाव उज्वल केले आहे. त्याच पद्धतीने आपले तंत्रज्ञान आणि आर्थिक गुंतवणूक वापरून बिहारलाही उद्योग जगतात प्रगती करण्यासाठी सहकार्य करावे.” ते पुढे म्हणाले की, बिहारमध्ये अपार औद्योगिक संधी आहेत. साखर उद्योगाप्रमाणेच इथेनॉल निर्मिती उद्योगातही प्रचंड क्षमता आहे, जो येणाऱ्या काळात देशाची ऊर्जेची गरज भागवण्यासाठी अत्यावश्यक आहे. बिहारचे ऊस उद्योग आयुक्त अनिल कुमार झा यांनी सांगितले की, चंपारणमध्ये महात्मा गांधींच्या यशस्वी आंदोलनानंतर ऊस शेती हा पर्याय पुढे आला आणि तेव्हापासून साखर उद्योगाने तिथे जोर धरला आहे.

‘व्हीएसआय’ला भेट, आधुनिक ऊस उत्पादनाची प्रक्रिया घेतली जाणून…

बिहारमध्ये साखर व इथेनॉल उत्पादन क्षेत्रात गुंतवणूक आकर्षित करण्याच्या उद्देशाने ऊस उद्योग मंत्री संजय कुमार यांनी शनिवारी आणि रविवारी पुण्याचा दौरा केला. या दौऱ्यात त्यांनी वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटला भेट देऊन ऊसाची आधुनिक शेती पद्धती आणि उच्च उत्पादकता देणाऱ्या वाणांची माहिती घेतली. त्यानंतर त्यांनी दौंड साखर कारखान्याला भेट देऊन साखरेचे अधिकतम उत्पादन कसे साध्य करता येते आणि ऊस उद्योगातून जास्तीत जास्त आर्थिक लाभ कसा मिळवता येतो, याचा अभ्यास केला. यावेळी गुंतवणूकदार आणि उद्योग क्षेत्रातील तज्ज्ञांसोबत बैठक घेऊन बिहारमधील ऊस उद्योगातील अमर्याद संधींबाबत माहिती दिली.

गुंतवणूकदारांचा गुंतवणूक करण्याबाबत सकारात्मक प्रतिसाद…

ऊस उद्योग विभागाच्या दाव्यानुसार, गुंतवणूकदारांनी बिहारमधील ऊस उद्योग, इथेनॉल उत्पादन, बायो-सीएनजी तसेच इतर कृषी-आधारित उद्योगांमध्ये गुंतवणूक करण्याबाबत सकारात्मक रस दर्शविला आहे. या दौऱ्याचा मुख्य उद्देश बिहारच्या ऊस उद्योगाचे आधुनिकीकरण, इथेनॉल व जैवऊर्जा क्षेत्राचा विस्तार, कृषी-आधारित उद्योगांमध्ये गुंतवणूक आकर्षित करणे आणि शेतकऱ्यांच्या उत्पन्नवाढीसाठी नव्या संधींचा अभ्यास करणे हा होता. तसेच गुंतवणूकदारांशी थेट संवाद साधून राज्यातील औद्योगिक विकासाला चालना देण्याचाही प्रयत्न करण्यात आला.

Bioenergy Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here