सांगली : तोडणी मुकादमांकडून वाहन मालकांची फसवणूक, प्रश्न अधिवेशनात मांडण्याचे आमदार देशमुख यांचे आश्वासन

सांगली : ऊस वाहतूक ट्रक-ट्रॅक्टर मालक संघा (पश्चिम महाराष्ट्र-कोल्हापूर)च्यावतीने ऊस तोडणी मुकादमांकडून वाहन मालकांची होणारी फसवणूक थांबविण्यासाठी प्रयत्न करण्याची मागणी करण्यात आली. याबाबत संघटनेने आमदार सत्यजित देशमुख यांना निवेदन दिले. ऊस वाहतूक ट्रक-ट्रॅक्टर वाहन मालकांची २००० पासून आजपर्यंत ऊस तोडणी मुकादमाकडून फसवणूक सुरू आहे. या संदर्भात संघटनेने हजारो वाहन मालकांच्या फसवणुकीची माहिती संकलित केली आहे. मुकादमांकडून झालेल्या आर्थिक फसवणुकीचा आकडा अंदाजे १०० कोटींच्या आसपास आहे. वाहन मालकांनी नोंद केलेल्या फसवणूक प्रकरणाचा हा आकडा असला तरी प्रत्यक्षात महाराष्ट्रातील अनेक वाहनधारकांनी तक्रार नोंदवलेली नाही. हा फसवणुकीचा आकडा ८०० कोटींवर जाईल असा दावा संघटनेने केला आहे.

सरकारने ‘एसआयटी’ गठित करून माहिती घेतल्यास झालेल्या फसवणुकीची माहिती घ्यावी आणि संबंधितांवर कारवाई करून वसुली करून द्यावी अशी मागणी संघटनेने केली. यावेळी आमदार सत्यजित देशमुख यांनी “ऊस वाहतूक वाहन मालकांना मुकादमांकडून झालेल्या आर्थिक फसवणुकीसंदर्भात अधिवेशन काळात तारांकित लक्षवेधी प्रश्न मांडून ऊस वाहतूक ट्रक-ट्रॅक्टर-मालकांना न्याय मिळवून देणार आहे,” अशी ग्वाही दिली. यावेळी राज्य वाहतूक मालक संघाचे अध्यक्ष सर्जेराव जाधव, उपाध्यक्ष पटूदादा मेटकरी, निखिल घाटगे, संघटक राजू कुमठाळे उपस्थित होते. फसवणूक प्रकरणाची झळ हजारो वाहन मालकांना, त्यांच्या कुटुंबांना सोसावी लागली आहे. त्यांना न्याय मिळवून देण्याची मागणी निवेदनातून करण्यात आली आहे.

ChiniMandi WhatsApp Channel
Bioenergy Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here