अहिल्यानगर : मुळा साखर कारखान्याच्या २१ पैकी करजगाव गटातील दोन व महिला राखीवमधील एका जागेवरील होत असलेल्या मतदानाची तयारी पूर्ण झाली आहे. कारखान्यासाठी शुक्रवारी (ता. २६) मतदान होत आहे. निवडणूक निर्णय अधिकारी तथा प्रांताधिकारी सुधीर पाटील व पोलिस अधिकाऱ्यांनी सोनई येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर माध्यमिक विद्यालय व नेवासे येथील जिल्हा परिषद शाळेच्या मतदान केंद्रास भेट देऊन पाहणी केली.
‘मुळा’च्या तीन जागांसाठी १७ हजार ४०१ सभासद बॅलेट पेपरवर मतदान करणार असल्याने सोनई येथील केंद्रावर आठ खोल्या, तर नेवासे येथे चार खोल्या उपलब्ध करण्यात आल्या आहेत. प्रत्येक खोलीसाठी सहा कर्मचारी, तर दोन केंद्रासाठी दोन झोनल अधिकारी असतील, असे निवडणूकनिर्णय अधिकारी सुधीर पाटील यांनी सांगितले. तयारी, मतदान व निकाल अशा तीन दिवसांकरिता दोन अधिकारी व ४९ पोलिस कर्मचारी बंदोबस्ताकरिता असतील, असे सहायक पोलिस निरीक्षक अनिल मोरे यांनी सांगितले. डॉ. आंबेडकर विद्यालयाच्या मतदान केंद्रास भेटीदरम्यान वाहनतळ, सावली किंवा पावसापासून बचाव म्हणून मंडप, स्वच्छतागृह, फिरते शौचालय व पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. प्रत्येक खोलीत एक ते दीड हजार मतदार मतदान करू शकतील, अशी व्यवस्था करण्यात आली.


















