पुणे : हुमणी किडीच्या नियंत्रणासाठी कृषी विभागाने आपले प्रयत्न सुरू केले आहेत. त्यासाठी गावोगावी, शेतकऱ्याच्या बांधावर जावून जनजागृती केली जात आहे. कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी शिंगवे (ता. आंबेगाव) येथील शेतकरी सुभाष गोरडे यांच्या शेतात प्रकाश सापळा उभारून त्याचे प्रात्यक्षिक दाखविले. यावेळी सहाय्यक कृषी अधिकारी प्रमोद भोर यांनी घरगुती बियाण्याची उगवण क्षमता, बीज क्रिया, बीबीएफ, एल निनो आणि महाडीबीटी पोर्टलची माहिती दिली.
तालुका कृषी अधिकारी सिद्धेश ढवळे यांनी सांगितले की, हुमणी किडीच्या प्रभावी नियंत्रणासाठी शेतकऱ्यांनी प्रकाश सापळ्यांचा वापर करावा. पहिल्या पावसानंतर हुमणीचे प्रौढ भुंगेरे मोठ्या प्रमाणात जमिनीतून बाहेर पडतात व प्रकाशाकडे आकर्षित होतात. या कालावधीत प्रकाश सापळ्यांच्या साहाय्याने भुंगेऱ्यांचे संकलन केल्यास त्यांची संख्या कमी होऊन पुढील काळातील हुमणीचा प्रादुर्भाव आटोक्यात आणण्यास मोठी मदत होते, असे त्यांनी सांगितले. यावेळी एससी, एसटी व सर्वसाधारण शेतकऱ्यांनी महाडीबीटी पोर्टलवर अर्ज कसा करावा, याचे मार्गदर्शन करण्यात आले. मंडळ कृषी अधिकारी प्रसन्न जाधव, उपकृषी अधिकारी अरुण जोरी, सहाय्यक कृषी अधिकारी सचिन जाधव, शेतकरी विनायक गोरडे, किशोर गोरडे, प्रवीण गोरडे, संतोष गोरडे, अतुल गोरडे, सुशीला गोरडे उपस्थित होते.


















