कोल्हापूर : सध्या हवामानातील बदलांमुळे उसामध्ये विषाणूजन्य रोगांचा प्रादुर्भाव वाढत आहे. को ८६०३२ या जातीवर तसेच इतर रुंद पाने असणाऱ्या जातीमध्ये प्रादुर्भाव झपाट्याने पसरत आहे. रोग तसेच विकृतीमुळे ऊस आणि साखरेच्या उत्पादनात घट येते. विविध रोगांची लक्षणे ओळखून नियंत्रणाच्या उपाययोजना कराव्यात असा सल्ला कृषीतज्ज्ञांनी दिला आहे. लागवडीच्या उसात रोगाचा प्रादुर्भाव कमी असल्यास वाढीवर फारसा परिणाम आढळून येत नाही, परंतु खोडवा पिकावर अधिक परिणाम होऊन उत्पादनात मोठ्या प्रमाणावर घट येऊ शकते.
प्रादुर्भाव जास्त प्रमाणावर असलेल्या पिकात जाडी व उंची कमी झाल्यामुळे उत्पादनात घट येते. रस शोषण करणाऱ्या किडींच्या नियंत्रणासाठी इमिडाक्लोप्रिड ०.३ मिलि प्रति लिटर पाण्यात मिसळून दर पंधरा दिवसाच्या अंतराने फवारणी करावी. पिकास इतर कोणताही ताण जैविक आणि अजैविक घटकामुळे होणारा ताण कमी करावा असा सल्ला तज्ज्ञांनी दिला आहे.
वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटचे ऊस रोग शास्त्र विभागाचे डॉ. गणेश कोटगिरे यांनी सांगितले की, ऊस पिकावर गवताळ वाढ, शुगरकेन मोझेक या रोगांचाही प्रादुर्भाव दिसून येत आहे. रोगाचे प्रमाण सुरुवातीच्या काळात जास्त आढळते. प्रसार मुख्यत्वेकरून दूषित बेण्यामार्फत व किडीद्वारे होतो. त्यामुळे उगवण झाल्यानंतर नियमितपणे पाहणी करून रोगट बेटे मुळासहित काढावीत, जाळून नष्ट करावीत. सामूहिक पद्धतीने बेटे निर्मूलनाचा कार्यक्रम हाती घेतल्यास रोगाचे नियंत्रण होते.
रस शोषण करणाऱ्या किडींच्या नियंत्रणासाठी इमिडाक्लोप्रिड ०.३ मिलि प्रति लिटर पाण्यात मिसळून दर पंधरा दिवसाच्या अंतराने फवारणी करावी. रोगाचे प्रमाण २० टक्क्यांपेक्षा जास्त असल्यास खोडवा घेऊ नये. पिकाची फेरपालट करावी, जेणेकरून या रोगाचे प्रमाण पुढील पिकात कमी राहील असा सल्ला तज्ज्ञांनी दिला आहे. याशिवाय, ऊस पिकावरील शुगरकेन मोझेक रोगामुळे पिकातील हरितद्रव्य कमी झाल्याने प्रकाशसंश्लेषण कमी होऊन वाढ कमी होते. त्यावर उपाय म्हणून लागवड तसेच खोडवा नियोजन शास्त्रीय पद्धतीने करावे तसेच मावा किडीच्या नियंत्रणासाठी इमिडाक्लोप्रिड ०.३ मिलि प्रति लिटर पाण्यात मिसळून दर पंधरा दिवसांच्या अंतराने फवारणी करावी, असे तज्ज्ञांनी सुचवले आहे.


















