नवी दिल्ली : देशातील ९० टक्के वाहने २०२३ च्या पूर्वीची असून त्यात इथेनॉल-२० टाकणे उचित नाही. २०२३ पूर्वीच्या वाहनांमध्ये इथेनॉल २० टाकल्यास ते विषारी ठरू शकते. म्हणून इथेनॉल-५ किंवा इथेनॉल – १० उपलब्ध करण्यात यावे, अशी मागणी अनेक प्रसिद्ध व्यक्तींसह (सेलिब्रिटीज) सर्वसामान्य नागरिकांकडून केली जात आहे. केंद्र सरकार एकतर्फी इथेनॉल मिश्रण धोरण राबवत असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. या धोरणाला विरोध करण्यासाठी येत्या ५ जुलै रोजी जंतरमंतर येथे आंदोलन करण्यात येणार आहे. आंदोलनात दहा हजार नागरिक सहभागी होतील, अशी माहिती तहसीन पूनावाला यांनी दिली. हे आंदोलन राजकारणविरहित असून देशहितासाठी असल्याचा दावा त्यांनी केला. दैनिक ‘अॅग्रोवन’ने याबाबतचे वृत्त दिले आहे.
पूनावाला म्हणाले की, केंद्र सरकारने या धोरणाशी संबंधित सर्व दस्तावेज आणि अहवाल सार्वजनिक करावा. तसेच हे धोरण ठरवताना पेट्रोलियम, कृषी आणि अन्य मंत्रालयांचे तसेच वाहन उद्योगांचे कोणी कोणी प्रतिनिधित्व केले, याची माहिती देण्यात यावी. आमचे आंदोलन कुठल्याही राजकीय पक्षाविरुद्ध नसून केंद्र सरकारच्या एकतर्फी इथेनॉल धोरणाविरुद्ध आहे. त्यात कोणावरही वैयक्तिक टीका होणार नाही. आमचा इंधनातील इथेनॉलच्या मिश्रणाला विरोध नाही. पण पेट्रोलमध्ये इथेनॉलचे २०, २५ किंवा ३० टक्के मिश्रण करायचे असेल तर सर्वप्रथम त्यासाठी ब्राझीलमध्ये १९७० साली तयार झाल्या तशा सर्वांगीण पायाभूत सुविधांची निर्मिती करण्यात यावी. तरच वाहनधारकांचे नुकसान कमी होऊ शकेल, असे त्यांनी म्हटले आहे.


















