साओ पावलो : ब्राझीलमधील २०२६-२७ च्या ऊस हंगामासाठी एल निनो ही हवामानाची घटना फायदेशीर ठरू शकते. एल निनोच्या प्रभावामुळे ऑगस्टपर्यंत सामान्यपेक्षा जास्त पाऊस पडण्याची शक्यता आहे. त्यामुळे ऊस पिकाच्या वाढीला चालना मिळू शकते, असे जगातील सर्वात मोठी साखर व्यापार कंपनी असलेल्या कोपर्सुकारचे सीईओ, तोमास मानझानो यांनी मंगळवारी सांगितले. तथापि, चांगले पीक आले तरी, एल निनोचा प्रभाव ऊस गाळप आणि साखरेच्या वाहतुकीसाठी अनुकूल ठरणार नाही असे मानझानो यांनी स्पष्ट केले. ते म्हणाले की, प्रतिकूल हवामानामुळे कामकाजावर परिणाम होऊ शकतो. त्यामुळे उत्पादन आणि पुरवठ्यावर परिणाम होण्याची शक्यता आहे.
प्रख्यात साखर व्यापारी कंपनी असलेल्या कोपर्सुकारने २०२५-२६ हंगामात आपली साखर विक्री मागील वर्षाच्या तुलनेत सुमारे ९ टक्क्यांनी वाढून १७ दशलक्ष टन झाली असल्याचे मंगळवारी प्रसिद्ध केलेल्या आर्थिक आकडेवारीत म्हटले आहे. कंपनीच्या म्हणण्यानुसार, या कालावधीत इथेनॉलची विक्रीदेखील १० टक्क्यांनी वाढून २१ अब्ज लिटर झाली, कंपनीचा एकूण महसूल मागील वर्षाच्या तुलनेत ५.५ टक्क्यांनी वाढून ६५.८ अब्ज ब्राझिलियन रियाल (अंदाजे १२.७ अब्ज अमेरिकन डॉलर्स) झाला. कंपनीला भविष्यातही विक्रीत सातत्यपूर्ण वाढ अपेक्षित आहे. कंपनीच्या प्रक्रिया आणि लॉजिस्टिक्स सुविधांचा विस्तार, उसाच्या मोठ्या पिकाची अपेक्षा आणि जागतिक बाजारपेठेत साखरेची वाढती मागणी ही यामागील प्रमुख कारणे असतील असे तोमास मानझानो यांनी सांगितले.


















