सातारा : जयपूर येथील शिवनेरी शुगर्स कारखान्याच्या २०२६-२७ च्या गळीत हंगामासाठी रोलर पूजन उत्साहात झाले. कारखान्याचे संस्थापक, अध्यक्ष सुशांत पाटील, संचालक दादासाहेब सूर्यवंशी, युनिट हेड राम पाटील, तसेच अधिकारी, कर्मचारी, ऊस उत्पादक शेतकरी उपस्थित होते. जनरल मॅनेजर (केन) विलास पाटील यांच्या हस्ते विधिवत रोलर पूजन करण्यात आले.
यावेळी अध्यक्ष सुशांत पाटील म्हणाले, यंदाच्या गळीत हंगामासाठी कारखान्याने सुमारे ११ हजार हेक्टर उसाची नोंदणी केली असून, आवश्यक तोडणी व वाहतूक यंत्रणा सज्ज करण्यात आली आहे. हंगामात सुमारे ७ लाख ५० हजार मेट्रिक टन ऊस गाळपाचे उद्दिष्ट निश्चित केले असून, शेतकऱ्यांनी सहकार्य करावे. यावेळी सर्व कर्मचाऱ्यांना महाराष्ट्र कल्याण कामगार मंडळाच्या शिष्यवृत्तीचे धनादेश वितरित करण्यात आले. युनिट हेड राम पाटील यांनी आभार मानले.


















