लातूर: बेलकुंड येथील संत शिरोमणी मारुती महाराज सहकारी साखर कारखान्यात सन २०२६-२७ च्या गळीत हंगामासाठी रोलर पूजन सहकारमहर्षी दिलीपराव देशमुख व आमदार अभिमन्यू पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत झाला. या कार्यक्रमात कारखान्याच्या ४५ केएलपीडी क्षमतेच्या अत्याधुनिक डिस्टिलरी प्रकल्पाचे भूमिपूजन आणि डिस्टिलरी प्रकल्पाच्या उभारणीचा शुभारंभ करण्यात आला. कारखान्याच्या प्रगतीच्या दृष्टीने हा सोहळा महत्त्वपूर्ण टप्पा मानला जात आहे. ‘सहकाराच्या माध्यमातून उभारले जाणारे आधुनिक प्रकल्प हे शेतकऱ्यांच्या उत्पन्नवाढीचे प्रभावी साधन आहेत. डिस्टिलरीमुळे उपउत्पादनांचा योग्य वापर, कारखान्याचे आर्थिक सक्षमीकरण आणि ग्रामीण अर्थव्यवस्थेला नवी चालना मिळेल, असा विश्वास दिलीपराव देशमुख यांनी यावेळी व्यक्त केला.
आमदार अभिमन्यू पवार म्हणाले की, नव्या प्रकल्पामुळे ग्रामीण भागात रोजगार व उद्योगवृद्धीला चालना मिळेल. डिस्टिलरी प्रकल्पामुळे कारखान्याचे आर्थिक बळ वाढण्याबरोबरच ऊस उत्पादकांना अधिक मूल्य मिळेल. स्थानिक युवकांसाठी रोजगाराच्या नव्या संधी निर्माण होतील. ग्रामीण विकासाला गती देणाऱ्या अशा उपक्रमांना माझे कायम सहकार्य राहील. या वेळी ४५ केएलपीडी क्षमतेचा डिस्टिलरी प्रकल्प कार्यान्वित झाल्यानंतर कारखान्याच्या ऊत्पन्नाच्या स्रोतांमध्ये वाढ होणार आहे. मळीसह इतर उपउत्पादनांचा शास्त्रोक्त व प्रभावी वापर होऊन आर्थिक सक्षमीकरणाला चालना मिळेल असे सांगण्यात आले. कार्यक्रमास राज्य साखर संघाचे उपाध्यक्ष आबासाहेब पाटील, जिल्हा बँकेचे व्हाईस चेअरमन प्रमोद जाधव, प्रवीण पाटील, कारखान्याचे चेअरमन शाम भोसले, व्हाईस चेअरमन सचिन पाटील, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष संतोष देशमुख, सभापती चंद्रशेखर सोनवणे, उपसभापती भीमाशंकर राचटे, जिल्हा परिषद सदस्य सुभाष पवार आदी उपस्थित होते. पी. सी. पाटील यांनी सूत्रसंचालन केलेय. गणपती बाजुळगे यांनी आभार मानले.


















