कोल्हापूर : उसाच्या दुसऱ्या हप्त्यासाठी ‘स्वाभिमानी’चा प्रादेशिक साखर सहसंचालकांकडे पाठपुरावा

कोल्हापूर : गेल्यावर्षीचा गळीत हंगाम संपून मोठा कालावधी उलटून गेला तरी अद्याप अनेक साखर कारखान्यांनी शेतकऱ्यांच्या हक्काचा हा दुसरा हप्ता त्यांच्या बँक खात्यावर जमा केलेला नाही. सध्या नवीन हंगामाची पूर्वतयारी सुरू असून, गगनाला भिडलेल्या महागाईमुळे शेतकऱ्यांना खते, बियाणे आणि मशागतीसाठी पैशांची अत्यंत आवश्यकता आहे. कारखानदारांच्या या दिरंगाईमुळे ऊस उत्पादक शेतकरी मोठ्या आर्थिक अडचणीत सापडला आहे. त्यामुळे सांगली व कोल्हापूर जिल्ह्यातील साखर कारखान्यांनी प्रतिटन १०० रुपये दुसरा हप्ता तातडीने देण्याची मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने केली आहे. संघटनेच्या शिष्टमंडळाने प्रादेशिक साखर सहसंचालक उज्ज्वला पळसकर यांची भेट घेऊन निवेदन दिले. साखर कारखान्यांतील काटामारी व रिकव्हरी चोरीचा मुद्दाही संघटनेने उपस्थित केला आहे.

याबाबत स्वाभिमानी शेतकरी संघटनेने म्हटले आहे की, सध्या साखर कारखान्यांच्या साखरेसह इतर उपपदार्थांना राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत चांगले भाव मिळाले आहेत. यामुळे दोन्ही जिल्ह्यांतील साखर कारखान्यांना १०० रुपये दुसरा हप्ता देणे सहज शक्य आहे. तरी दोन्ही जिल्ह्यांतील सर्व साखर कारखान्यांना तातडीने आदेश निर्गमित करून दुसरा हप्ता प्रतिटन १०० रुपये शेतकऱ्यांच्या खात्यावर येत्या १५ दिवसांत जमा करण्यात यावे; अन्यथा कारखानानिहाय तीव्र आंदोलन सुरू करून साखर कारखान्यांची साखर व उपपदार्थ विक्री रोखण्याचा इशारा यावेळी देण्यात आला. स्वाभिमानीचे जिल्हाध्यक्ष अजित पोवार, राज्य सचिव राजेंद्र गड्यान्नावर, राज्य कार्यकारिणी सदस्य जयकुमार कोले, सचिन शिंदे, विशाल चौगुले, पुरंदर पाटील, डॉ. बाळासाहेब पाटील, तानाजी देसाई, तानाजी मगदूम, अरुण मगदूम, बाजीराव पाटील, धूळगोंडा पाटील, नितेश कोगनोळे यांच्यासह ‘स्वाभिमानी’चे पदाधिकारी उपस्थित होते.

ChiniMandi WhatsApp Channel
Bioenergy Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here