बेळगाव : राज्यात ऊस दरासाठी आंदोलन झाल्यानंतर साखर कारखानदारांनी जाहीर केलेल्या दरावर आंदोलन मागे घेण्यात आले. मात्र राज्य सरकारकडून शेतकऱ्यांना अद्याप कोणतीही आर्थिक मदत जाहीर करण्यात आलेली नाही. त्यामुळे सरकारने ऊस उत्पादक शेतकऱ्यांना प्रतिटन किमान १,००० रुपये विशेष अतिरिक्त प्रोत्साहन अनुदान (एसएपी) द्यावे, अशी मागणी शेतकरी संघटनांनी केली आहे. या मागणीसाठी हिवाळी अधिवेशनादरम्यान सरकारचे लक्ष वेधण्याकरिता मोर्चा, धरणे किंवा अन्य आंदोलन करण्याची रणनीती आखली जात आहे. शेतकरी संघटनांकडून याबाबत प्राथमिक तयारी सुरू करण्यात आली आहे.
याबाबत शेतकरी नेते प्रकाश नायक यांनी सांगितले की, साखर कारखान्यांनी आपल्या परीने ऊसदर दिला आहे. मात्र, सरकारकडून एसएपी अनुदान मिळालेले नाही. त्यामुळे हिवाळी अधिवेशनात शेतकरी संघटनांच्या माध्यमातून आंदोलन करून प्रतिटन एक हजार रुपये अनुदान मिळविण्यासाठी सरकारचे लक्ष वेधण्यात येईल. राज्य सरकारनेही शेतकऱ्यांना आर्थिक मदत द्यावी, अशी आमची मागणी आहे. आगामी हिवाळी अधिवेशनात हा प्रश्न उपस्थित केला जाणार आहे. दरम्यान, आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर प्रशासनही सतर्क झाले आहे. गुप्तचर यंत्रणा आणि पोलिसांकडून परिस्थितीवर लक्ष ठेवण्यात येत आहे. अधिवेशन काळात मोर्चा, धरणे आंदोलन किंवा रास्ता रोको होण्याची शक्यता लक्षात घेऊन खबरदारी घेतली जात आहे.


















