सातारा : यशवंतराव मोहिते कृष्णा सहकारी साखर कारखान्याअंतर्गत असलेल्या उपसा जलसिंचन योजनांचा विस्तार मूळ क्षमतेपेक्षा मोठ्या प्रमाणात वाढला असून, या योजनांचे ‘इन्फ्रास्ट्रक्चर ऑडिट’ करणार आहोत. तसेच या योजनांचे आधुनिकीकरण करणार आहोत, अशी माहिती कारखान्याचे चेअरमन डॉ. सुरेश भोसले यांनी दिली. माजी मंत्री व ज्येष्ठ नेते दिलीपराव देशमुख यांनी कारखान्याला विशेष सदिच्छा भेट दिली. यावेळी ते बोलत होते. यावेळी कारखान्याचे चेअरमन डॉ. सुरेश भोसले, आ. डॉ. अतुलबाबा भोसले, व्हाईस चेअरमन जे.डी. मोरे, एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर सी. एन. देशपांडे, कार्यकारी संचालक बाजीराव सुतार आदी प्रामुख्याने उपस्थित होते.
यावेळी आमदार डॉ. अतुल भोसले म्हणाले, गेल्या अकरा वर्षांत कारखान्याची गाळप क्षमता ७,२०० टनांवरून १२,००० मेट्रिक टनांपर्यंत वाढविण्यात आली आहे. आता दुसऱ्या टप्प्यातील आधुनिकीकरण आणि विस्तारासाठी पुढील पाच वर्षांचे टप्प्याटप्प्याने नियोजन करण्यात येणार आहे. तर माजी मंत्री देशमुख यांनी राज्यातील इतर सहकारी संस्थांसाठी हा कारखाना प्रेरणादायी आणि दिशादर्शकच आहे. डॉ. सुरेश भोसले यांच्यासारखे अभ्यासू आणि आमदार डॉ. अतुलबाबा भोसले यांच्यासारखे धडाडीचे नेतृत्व लाभल्यामुळेच कृष्णा कारखान्याने आपले गतवैभव तर मिळवलेच, पण ते अनेक पटींनी वृद्धिंगतही केले असल्याचे सांगत कारखान्याचे कौतुक केले. याप्रसंगी संचालक धोंडिराम जाधव, दयाराम पाटील, आनंदा खबाले, बाजीराव थोरात, सत्यजित पाटील, सुनील पाटील, बाजीराव निकम, अविनाश खरात, सुनीता शेवाळे, छबन कांबळे, एम. के कापूरकर उपस्थित होते. संचालक बाबासो शिंदे यांनी स्वागत केले.


















