सातारा / सांगली : केंद्र सरकारच्या शेतकरीविरोधी धोरणांविरोधात स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी आता प्रचंड आक्रमक पाऊल उचलले आहे. काल राष्ट्रीय महामार्ग रोको आंदोलन स्थगित केल्यानंतर, आज राजू शेट्टी यांनी आपला मोर्चा थेट सांगली आणि सातारा जिल्ह्यातील साखर कारखान्यांकडे वळवला. दिवसभरात त्यांनी अनेक प्रमुख साखर कारखान्यांना थेट धडक देत ‘काटा बंद’ आंदोलन पुकारले, ज्यामुळे पश्चिम महाराष्ट्रातील साखर पट्ट्यात एकच खळबळ उडाली आहे. राजू शेट्टींच्या या आक्रमक पवित्र्यापुढे सर्वच कारखान्यांनी आपले कामकाज बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.
MSP वाढत नाही तोपर्यंत कारखान्याचे धुराडे पेटू देणार नाही
राजू शेट्टी यांनी गुरुवारी सकाळपासूनच सांगली आणि सातारा जिल्ह्यातील मातब्बर साखर कारखान्यांना लक्ष्य केले. यामध्ये कराडचा कृष्णा कारखाना,कुंडलचा क्रांती कारखाना,वांगीचा सोनहिरा कारखाना,वाळव्याचा हुतात्मा कारखाना, चिखलीचा विश्वास कारखाना या सर्व कारखान्यांच्या वजन काट्यावर ‘स्वाभिमानी’च्या कार्यकर्त्यांसह धडक मारत, जोपर्यंत केंद्र सरकार साखरेचा हमीभाव (MSP) वाढवत नाही, तोपर्यंत कारखान्याचे धुराडे पेटू देणार नाही आणि सर्व कारखाने बंद ठेवणार, असा निर्धार राजू शेट्टी यांनी व्यक्त केला.
अन्यायी धोरणांविरोधात रस्त्यावरची आरपारची लढाई
यावेळी कारखानदारांना आणि प्रशासनाला इशारा देताना राजू शेट्टी म्हणाले, “चालू वर्षी शेतकरी केंद्र सरकारच्या अन्यायी धोरणांविरोधात रस्त्यावरची आरपारची लढाई लढत आहे. साखरेचा हमीभाव वाढला, तर या लढाईत शेतकऱ्यांपेक्षा जास्त फायदा खुद्द कारखानदारांचाच होणार आहे. त्यामुळे सर्व कारखानदारांनी कोणत्याही राजकीय किंवा शासकीय दबावाला बळी न पडता या आंदोलनाला जाहीर सहकार्य करावे. जर कोणी कारखाने सुरू ठेवण्याचा प्रयत्न केला, तर होणाऱ्या तीव्र नुकसानीची संपूर्ण जबाबदारी सर्वस्वी कारखान्यांची असेल!”
….तर साखरेच्या पोत्यावर बँकांनी योग्य कर्ज दिले असते
शेट्टी म्हणाले, साखरेचा किमान विक्री दर गेल्या सात वर्षांत केंद्र सरकारने वाढवलेला नाही. त्यामुळे बँका साखर कारखान्यांना साखरेच्या पोत्यावर कर्ज देताना हात आखडता घेतात. कारण किमान विक्री दराच्या तुलनेत बाजारभाव किती राहील, याची बँकांना खात्री नसते. बाजारभाव कायम चढ-उतार होत असतात. जर साखरेचा किमान विक्री दर 50 रुपयांच्या आसपास असता, तर महागाई वाढण्याचा प्रश्नच नव्हता. सध्या साखर किरकोळ बाजारात 56-57 रुपये किलोने विकली जात आहे. बाजारभावाच्या जवळपास स्थिर राहील, असा किमान विक्री दर ठरवला असता, तर साखरेच्या पोत्यावर बँकांनी चांगल्या पद्धतीने कर्ज दिले असते, असेही शेट्टी म्हणाले.
स्वाभिमानीच्या ‘काटा बंद’ आंदोलनाची पूर्वकल्पना असल्याने आणि कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून पोलीस प्रशासन आधीच सतर्क झाले होते. सर्वच साखर कारखान्यांच्या परिसरात सकाळपासूनच मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. केंद्र सरकार आता साखरेचा हमीभाव वाढवणार का, याकडे आता संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.


















