हुपरी : साखर आयुक्त डॉ. संजय कोलते यांच्याकडून राज्यातील निवडक साखर कारखान्यांना भेटीचा उपक्रम सुरू आहे. त्याअंतर्गत त्यांनी येथील कल्लाप्पाण्णा आवाडे जवाहर सहकारी साखर कारखान्याला भेट दिली. कोल्हापूर विभागाच्या प्रादेशिक साखर सहसंचालक उज्ज्वला पळसकर उपस्थित होत्या. जवाहर साखर कारखान्याने ऊस शेतीसाठी ठिबक सिंचन, कृत्रिम बुद्धिमत्ता आणि आधुनिक तंत्रज्ञानाचा केलेला यशस्वी प्रयोग इतर कारखान्यांसाठी अनुकरणीय आहे, असे प्रतिपादन डॉ. कोलते यांनी यावेळी केले.
या भेटीदरम्यान, आयुक्त डॉ. कोलते यांनी कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) तंत्रज्ञानाद्वारे ऊस शेती केलेल्या कसबा सांगाव येथील सुरेश मगदूम या शेतकऱ्याच्या ऊस शेतीची तसेच तळंदगे येथील कारखाना पुरस्कृत जवाहर पाणीपुरवठा संस्थेमार्फत राबविलेल्या १०० टक्के क्षेत्रावरील स्वयंचलित ठिबक सिंचन योजनेची पाहणी केली. कारखान्याचे संचालक तथा माजी आमदार प्रकाश आवाडे यांनी साखर आयुक्तांचे स्वागत केले. त्यांनी कारखान्यांच्या विविध उपक्रमांची माहिती दिली.


















