पुणे : बारामती तालुक्यातील श्री सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याची निवडणूक काही दिवसांवर येऊन ठेपली असतानाच राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाने निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याचे स्पष्ट संकेत दिले आहेत. याबाबतचा अंतिम निर्णय पुढील आठवडयात जाहीर करण्यात येणार असल्याची माहिती पक्षाचे नेते युगेंद्र पवार यांनी दिली.
निंबूत येथे बुधवारी आयोजित पक्षाच्या प्रमुख कार्यकर्त्यांच्या संवाद मेळाव्यात ते बोलत होते. यावेळी कार्यकर्त्यांशी संवाद साधून त्यांच्या भावनाकार्यकर्त्यांच्या संवाद मेळाव्यात युगेंद्र पवारांचे स्पष्ट संकेत; अंतिम निर्णय पुढील आठवड्यात व मतांचा आढावा घेण्यात आला. ‘आजची बैठक प्राथमिक स्वरूपाची होती. बहुतांश कार्यकर्त्यांनी सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याची निवडणूक पक्षाने लढवावी, अशी भूमिका मांडली आहे. सर्वांचे मत जाणून घेतल्यानंतर पक्षाची अधिकृत भूमिका पुढील आठवडचात जाहीर केली जाईल,’ असे युगेंद्र पवार यांनी स्पष्ट केले.
मेळाव्यात उपस्थित कार्यकर्त्यांनी आगामी निवडणुकीत पक्षाने पूर्ण ताकदीने उतरावे, अशी एकमुखी मागणी केली. त्यामुळे सोमेश्वर कारखान्याच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाची भूमिका काय असेल, याकडे सभासदांसह संपूर्ण राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे. दरम्यान, राज्यातील दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस गट एकत्र येण्याच्या चर्चाना वेग आला असतानाच शरद पवार गटाने माळेगाव कारखान्यानंतर सोमेश्वर कारखान्याची निवडणूक लढविण्याचे संकेत दिल्याने राजकीय समीकरणांना नवे वळण मिळण्याची शक्यता व्यक्त होत आहे. या संवाद मेळाव्यास ज्येष्ठ नेते माणिकराव झेंडे, दत्तात्रय चव्हाण, सतीश खोमणे, तालुकाध्यक्ष राजेंद्र जगताप, प्रवीण भोसले, प्रदीप कणसे, विजय वाडकर, केतन भोसले, प्रदीप शेंडकर उपस्थित होते.


















