अहिल्यानगर : महाराष्ट्र राज्य साखर कामगार प्रतिनिधी मंडळाच्यावतीने आजपासून (30 जुलै) तीन दिवसांचे राज्यस्तरीय साखर कामगार कार्यकर्ता मार्गदर्शन शिबिर शिर्डी (जि. अहिल्यानगर) येथे आयोजित केले आहे. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या हस्ते या शिबिराचे उद्घाटन होणार आहे. जलसंपदामंत्री राधाकृष्ण विखे-पाटील, आमदार जयंत पाटील, माजी मंत्री आमदार प्रकाश आवाडे, मोनिका राजळे, आशुतोष काळे, सोमेश्वर कारखान्याचे अध्यक्ष पुरुषोत्तम जगताप, सहकारमहर्षी कारखान्याचे अध्यक्ष राजेंद्र नागवडे प्रमुख उपस्थित राहणार आहेत. प्रतिनिधी मंडळाचे राज्य अध्यक्ष तात्यासाहेब काळे, राज्य कार्याध्यक्ष राजेंद्र चव्हाण यांनी ही माहिती दिली. राज्य सरचिटणीस राऊसाहेब पाटील, कार्याध्यक्ष अविनाश आपटे, कोषाध्यक्ष प्रदीप बनगे, उपाध्यक्ष युवराज रणवरे, नितीन बनकर, दत्तात्रय निमसे, प्रदीप शिंदे, सचिव राजेंद्र तावरे, सयाजी कदम, संजय मोरबाळे, संजय पाटील, योगेश हंबीर आदींनी याचे नियोजन केले आहे.
शिबिराच्या पहिल्या दिवशी अॅड. ए. पी. चौगुले यांचे ‘नवीन श्रम संहिता व कामगारांनी घ्यावयाची दक्षता’, तर दुपारी संजय वढावकर यांचे ‘कारखानदारी आणि कामगारांची अवस्था’ विषयावर व्याख्यान आहे. शुक्रवारी सकाळी खासदार नीलेश लंके, आमदार प्राजक्त तनपुरे, विवेक कोले, ‘भोगावती’चे अध्यक्ष प्रा. शिवाजीराव पाटील, मिलिंद रानडे उपस्थित राहतील. महाराष्ट्र राज्य सहकारी साखर कारखाना संघाचे व्यवस्थापकीय संचालक संजय खताळ यांचे ‘कामगार चळवळ व त्यापुढील आव्हाने’वर व्याख्यान आहे. अॅड. संतोष मस्के यांचे ‘कामगार कायदे व चळवळ’ या विषयावर, तर अॅड. दीपक भालेराव यांचे ‘नवीन कामगार कायदे’ विषयावर व्याख्यान आहे. दि. १ ऑगस्ट रोजी सकाळी माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या प्रमुख उपस्थितीत सांगता समारंभ होईल. खासदार भाऊसाहेब वाघचौरे, माजी मंत्री शंकरराव गडाख, माजी आमदार नरेंद्र घुले-पाटील, छत्रपती साखर कारखान्याचे शिवाजीराव निंबाळकर उपस्थित राहतील.


















