सांगली : महांकाली साखर कारखान्याच्या निवडणुकीत सत्ताधारी-विरोधक आमनेसामने; कारखान्याच्या पुनरुज्जीवनावर राजकीय संग्राम

सांगली : महांकाली शेतकरी सहकारी साखर कारखान्याच्या बहुप्रतीक्षित निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला आहे. कारखाना बंद पडल्यानंतर प्रथमच निवडणूक होत असल्याने शेतकरी, सभासद, कामगार आणि राजकीय पक्षांचे लक्ष या लढतीकडे लागले आहे. त्यामुळे ही निवडणूक केवळ संचालक मंडळाच्या निवडीपुरती मर्यादित न राहता कारखान्याच्या पुनरुज्जीवनाचा मार्ग आणि तालुक्यातील आगामी राजकीय समीकरणे ठरविणारी ठरणार असल्याचे मानले जात आहे. महांकाली साखर कारखान्याच्या कार्यक्षेत्रात महाराष्ट्राबरोबरच कर्नाटकातील सभासदांचाही समावेश आहे. या निवडणुकीत १४,९२५ वैयक्तिक सभासद, ५० संस्था, १,४३४ ब-वर्ग सभासद आणि एक एमएससीएस सभासद मतदानाचा हक्क बजावणार आहेत. त्यामुळे या निवडणुकीकडे दोन्ही राज्यांतील सहकार क्षेत्राचेही विशेष लक्ष लागले आहे.

गेल्या पाच वर्षांपासून महांकाली साखर कारखाना बंद असून जिल्हा मध्यवर्ती बँक आणि इतर वित्तीय संस्थांची कोट्यवधी रुपयांची कर्जे तसेच थकीत देणी यामुळे कारखान्याची आर्थिक स्थिती ढासळली आहे. याचा मोठा फटका शेतकरी, कामगार, ऊसतोड मजूर, वाहतूकदार आणि व्यापाऱ्यांना बसला आहे. त्यामुळे कारखाना पुन्हा सुरू करणे, कर्जमुक्तीचा मार्ग शोधणे आणि सभासदांचे हित सुरक्षित ठेवणे हेच निवडणुकीतील प्रमुख प्रचाराचे मुद्दे ठरणार आहेत. महांकाली साखर कारखाना बचाव कृती समितीच्या माध्यमातून यावेळी प्रथमच सत्ताधारी गटाविरोधात सक्षम विरोधी पॅनल उभे राहण्याची चिन्हे दिसत आहेत. नांगोळे येथे झालेल्या बैठकीत ज्येष्ठ नेते जयसिंगराव शेंडगे यांनी कारखाना बंद पडण्यामागील कारणांवर टीका करत सध्याच्या व्यवस्थापनावर निशाणा साधला.

ChiniMandi WhatsApp Channel

समितीचे प्रमुख संदीप आबा गिड्डे पाटील यांनी परिवर्तनाची हाक दिली असून मिलिंद कोरे यांच्यासह विविध पक्षांचे कार्यकर्ते आणि आमदार रोहित पाटील यांचे समर्थक प्रचारासाठी सक्रिय झाले आहेत. दुसरीकडे कारखान्याच्या चेअरमन अनिता सगरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतल्यानंतर सत्ताधारी गटानेही जोरदार मोर्चेबांधणी सुरू केली आहे. त्यामुळे आगामी निवडणूक सत्ताधारी विरुद्ध महांकाली बचाव कृती समिती अशा थेट लढतीत रंगण्याची शक्यता व्यक्त होत आहे.

Bioenergy Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here