गोड खाणार त्याला महाग लागणार : साखरेनंतर आता गुळाच्या दरात वाढ; ग्राहक हैराण

पुणे : साखरेच्या दरवाढीनंतर आता गुळाच्या बाजारातही तेजी आली असून ग्राहकांना आणखी महागाईचा सामना करावा लागत आहे. गुळाचे उत्पादन घटल्याने आणि परदेशातून तसेच देशांतर्गत बाजारातून मागणी वाढल्याने मागील पंधरा दिवसांत घाऊक बाजारात गुळाच्या दरात प्रति किलो ५ ते ६ रुपयांची वाढ झाली आहे. गेल्या महिनाभरापासून साखरेचे दर सातत्याने वाढत असताना आता गुळाच्याही किमती वाढल्याने किरकोळ बाजारातील गोड पदार्थ महाग होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

व्यापाऱ्यांच्या माहितीनुसार, अन्न व औषध प्रशासनाच्या भेसळविरोधी कारवाईनंतर अनेक गुन्हाळे बंद पडल्याने गुळाचे उत्पादन मोठ्या प्रमाणात घटले. त्याचवेळी स्थानिक बाजारपेठेबरोबरच इतर राज्ये आणि परदेशातूनही मागणी वाढली आहे. सध्या आषाढ महिना सुरू असून श्रावण, नवरात्र आणि दिवाळीपर्यंत गुळाची मागणी आणखी वाढण्याचा अंदाज व्यापाऱ्यांनी व्यक्त केला आहे.

ChiniMandi WhatsApp Channel

मागील आठवड्यात साखरेच्या दरातही प्रति किलो सुमारे ५ रुपयांची वाढ झाली आहे. उसाच्या तुटवड्यामुळे गुळनिर्मितीवर परिणाम झाला असून उत्पादन अपेक्षेपेक्षा कमी झाले आहे. जून महिन्यात नेहमीच्या तुलनेत केवळ २५ टक्के उत्पादन होत होते आणि बाजारात दररोज सुमारे २० टन गुळाची आवक होत होती. आता काही गुन्हाळे पुन्हा सुरू झाल्याने पुणे मार्केट यार्डातील भुसार विभागात गुळाची आवक ५० ते ६० टनांपर्यंत पोहोचली आहे.

व्यापाऱ्यांचे म्हणणे आहे की, उत्पादन कमी आणि मागणी जास्त असल्याने गुळाच्या दरात वाढ झाली आहे. पुढील काही महिन्यांत सण-उत्सवांची मालिका सुरू होत असल्यामुळे गुळाला चांगली मागणी राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे गुळाचे दर सध्याच्या पातळीवर कायम राहतील किंवा आणखी वाढू शकतात, असा अंदाज बाजारातील जाणकारांनी व्यक्त केला आहे.

Bioenergy Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here