सांगली : महांकाली कारखाना अनेक वर्षांपासून बंद असल्याने हजारो कुटुंबांवर आर्थिक संकट ओढवले आहे. अनेक गोरगरिबांचा संसार उद्ध्वस्त झाला आहे. त्यामुळे महांकाली बचाव समिती ताकदीने निवडणूक लढविणार आहे, अशी घोषणा महांकाली बचाव समितीचे नेते संदीप गिड्डे-पाटील यांनी केली. शिरढोण (ता. कवठेमहांकाळ) येथे महांकाली बचाव समितीच्या सभासद, कामगार व कार्यकर्त्यांची बैठक पार पडली, त्यावेळी ते बोलत होते. अनेक वर्षांपासून कारखाना बंद असल्याने शेतकरी, कामगार, सभासदांचे नुकसान झाले आहे. त्यामुळे बचाव समिती स्वतंत्रपणे ताकदीने निवडणूक लढवेल. निवडणुकीत परिवर्तन घडेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
माजी मंत्री अजितराव घोरपडे, आमदार जयंत पाटील, खासदार विशाल पाटील, आमदार रोहित पाटील यांच्यासह विविध पक्षातील नेत्यांना विश्वासात घेऊनच अंतिम पॅनेल तयार करणार असल्याची माहिती महांकाली बचाव समितीचे नेते गिड्डे- पाटील यांनी दिली. मिलिंद कोरे यांनी कारखाना पुन्हा सुरू करण्यासाठी आणि शेतकरी कामगारांना न्याय मिळवून देण्यासाठी सर्वांनी एकजुटीने काम करण्याचे आवाहन केले. महांकाली कारखान्याच्या पुनरुज्जीवनासाठी महांकाली बचाव समिती काम करीत आहे, असे ते म्हणाले. कारखान्याच्या पुनरुज्जीवनासाठी समितीकडे ठोस आराखडा आहे. कारखाना कर्जमुक्त करणे, गाळप क्षमता पाच हजार टनांपर्यंत वाढविणे, इथेनॉल प्रकल्प, को-जनरेशन व सीबीजी प्रकल्प सुरू करणे असे नियोजन केल्याचे सांगण्यात आले. गजानन कोठावळे, पांडुरंग पाटील, नेताजी पाटील, संजय बनसोडे यांनी मनोगत व्यक्त केले. बैठकीस विक्रम कोळेकर, अर्जुन कर्पे, आप्पासाहेब कोळेकर, भानुदास भोसले, सतीश नागणे, राकेश कोळेकर, जालिंदर करांडे, संजय सूर्यवंशी, विकास भोसले, मनोज देसाई, संभाजी पाटोळे, विजय शेजाळ यांच्यासह बचाव समितीचे पदाधिकारी, सभासद, कामगार, कार्यकर्ते उपस्थित होते.


















