पुणे : सांडपाण्याच्या प्रश्नावरून भीमाशंकर कारखान्याची बदनामी न करण्याचे कार्यकारी संचालकांचे आवाहन

पुणे : भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याने प्रदूषण नियंत्रणासाठी आवश्यक ती सर्व प्रकारची यंत्रणा बसविलेली असून संपूर्ण यंत्रणा योग्य पद्धतीने कार्यरत आहे. कारखान्याने अतिशय चांगल्या पद्धतीने उपाययोजना करून सांडपाण्यावर प्रक्रिया करून पुर्नवापर केला आहे. सध्या कारखान्याची सांडपाण्यावरून विनाकारण बदनामी केली जात असल्याची माहिती कारखान्याचे कार्यकारी संचालक चंद्रकांत ढगे यांनी दिली. पुढील हंगामाची तयारी करण्याच्या दृष्टीने ‘ऑफ सिझन’मध्ये सांडपाण्याच्या तळ्यातील गाळ काढून तळ्याची साफसफाई करणे गरजेचे असते. त्याकरिता तळ्यातील गाळ काढण्याचे काम दीपक एकनाथ करंडे (रा. काठापूर बु., ता. आंबेगाव) यांना दिलेले होते. त्यांनी कोणत्याही अधिकाऱ्याची परवानगी न घेता गाळमिश्रीत पाणी तळ्याच्या बाजुने सोडून दिल्याची माहिती ढगे यांनी दिली.

कार्यकारी संचालक ढगे यांनी सांगितले की, कारखान्याचा मागील गाळप हंगाम २० फेब्रुवारी २०२६ रोजी संपला आहे. हंगाम संपून ५ महिन्यांचा कालावधी झाला आहे. हंगाम कालावधीत कारखाना बंद झाल्यानंतर कारखान्यात कोणत्याही प्रकारचे सांडपाणी तयार होत नाही. आधीच्या हंगामातील तळ्यातील गाळ टँकर व मजूरांकरवी कारखान्यातील अधिकारी सांगतील त्या ठिकाणी नेऊन टाकण्यासाठी स्पष्ट सूचना कंत्राटदार करंडे यांना देण्यात आलेल्या होत्या. परंतु करंडे यांनी गाळ टँकरमध्ये भरण्याऐवजी व अधिकाऱ्यांची परवानगी न घेता दि. ३ ऑगस्ट रोजी रात्री ९च्या सुमारास तळ्याच्या तळाला असलेल्या गाळात पाणी सोडून, पातळ करून गाळ मिश्रित पाणी पंपाद्वारे तळ्याबाहेर सोडून दिले होते. त्यांनी परस्पर गाळमिश्रित पाणी बाहेर सोडल्यामुळे कारखान्याची बदनामी सुरू आहे. कारखान्याने अशा गोष्टीला कधीही थारा दिलेला नाही. त्यामुळे कारखान्याची विनाकारण बदनामी करण्याचा प्रयत्न करू नये, असे आवाहन करण्यात येत आहे.

ChiniMandi WhatsApp Channel
Bioenergy Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here