नवी दिल्ली: भारताची एकूण व्यापार तूट (वस्तू आणि सेवा क्षेत्रासह) जुलै 2026 मध्ये 31.5 टक्क्यांनी वाढून 15.03 अब्ज अमेरिकन डॉलर झाली आहे. वाणिज्य मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार, या कालावधीत आयात निर्यातीपेक्षा जास्त राहिल्यामुळे व्यापार तूट वाढली. जुलै 2026 मध्ये भारताची एकूण निर्यात (वस्तू आणि सेवा) 80.14 अब्ज डॉलर इतकी झाली, जी जुलै 2025 मधील 70.72 अब्ज डॉलरच्या तुलनेत 13.3 टक्क्यांनी अधिक आहे. दुसरीकडे, एकूण आयात जुलै 2025 मधील 82.16 अब्ज डॉलरवरून वाढून 95.16 अब्ज डॉलर झाली, म्हणजेच 15.8 टक्क्यांची वाढ झाली. परिणामी, भारताची एकूण व्यापार तूट 11.43 अब्ज डॉलरवरून 15.03 अब्ज डॉलरपर्यंत वाढली.
वस्तू निर्यातीने जुलै महिन्यातील नोंदवला सर्वोच्च विक्रम
भारताच्या निर्यात कामगिरीत सर्वात मोठा वाटा वस्तू (मर्चेंडाइज) निर्यातीचा राहिला. वस्तू निर्यात 19.63 टक्क्यांनी वाढून 44.24 अब्ज डॉलर झाली, जी गेल्या वर्षी याच महिन्यात 36.98 अब्ज डॉलर होती. वाणिज्य मंत्रालयाच्या माहितीनुसार, 44.24 अब्ज डॉलरची वस्तू निर्यात ही जुलै महिन्यातील भारताची आतापर्यंतची सर्वोच्च निर्यात ठरली आहे. यापूर्वी 2022 मध्ये 38.34 अब्ज डॉलरचा विक्रम नोंदवला गेला होता. तथापि, वस्तू आयात देखील 17.52 टक्क्यांनी वाढून 76.22 अब्ज डॉलर झाली, जी जुलै 2025 मध्ये 64.86 अब्ज डॉलर होती.
एप्रिल-जुलै 2026-27 कालावधीतील आकडे
2026-27 आर्थिक वर्षाच्या एप्रिल-जुलै कालावधीत भारताची एकूण निर्यात 13.16 टक्क्यांनी वाढून 316.42 अब्ज डॉलर झाली, तर मागील वर्षी याच कालावधीत ती 279.63 अब्ज डॉलर होती. या चार महिन्यांत एकूण आयात 17.28 टक्क्यांनी वाढून 365.85 अब्ज डॉलर झाली, जी मागील वर्षी 311.94 अब्ज डॉलर होती. त्यामुळे संचित व्यापार तूट 32.32 अब्ज डॉलरवरून 49.43 अब्ज डॉलरपर्यंत वाढली. मंत्रालयाच्या मते, ही 52.97 टक्क्यांची वाढ आहे.या कालावधीत वस्तू निर्यात 17.04 टक्क्यांनी वाढून 173.78 अब्ज डॉलर झाली, तर वस्तू आयात 19.27 टक्क्यांनी वाढून 292.38 अब्ज डॉलर झाली.
प्रमुख बाजारपेठांमध्ये निर्यातीची वाढ
आकडेवारीनुसार, भारताच्या काही प्रमुख निर्यात बाजारपेठांमध्ये उल्लेखनीय वाढ झाली आहे. चीनकडे वस्तू निर्यात एप्रिल-जुलै कालावधीत 5.72 अब्ज डॉलरवरून 7.78 अब्ज डॉलर झाली, तर अमेरिकेकडे निर्यात 33.48 अब्ज डॉलरवरून 34.49 अब्ज डॉलरपर्यंत वाढली.


















