पुणे : यशवंत सहकारी साखर कारखान्यातील कामगारांचे जुलै २०११ ते ऑगस्ट २०१८ या ८६ महिन्यांचा पगार, पीएफ व ग्रॅच्युइटीची ४३ कोटी १५ लाख ४६ हजार रुपयांची देणी थकीत आहेत. ही रक्कम १५ टक्के व्याजासह तातडीने अदा करावी, अशी मागणी यशवंत सहकारी साखर कामगार संघटनेने केली आहे. “कामगारांच्या संयमाचा अंत झाला असून, हक्काची रक्कम व्याजासह मिळालीच पाहिजे,” अशी भूमिका संघटनेने घेतली. यशवंत सहकारी साखर कामगार संघटनेची बैठक अध्यक्ष तात्यासाहेब काळे यांच्या अध्यक्षतेखाली झाली. यावेळी पदाधिकारी तसेच मोठ्या संख्येने कामगार उपस्थित होते. थकीत देणी तातडीने अदा न झाल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा बैठकीत देण्यात आला.
संघटनेचे जनरल सेक्रेटरी पंडित धुमाळ, उपाध्यक्ष बाळकृष्ण हरपळे, गुलाब चौधरी, सहसचिव नाना कुंजीर, पांडुरंग भालसिंग आणि कोषाध्यक्ष वसंत शेवाळे यांच्यासह पदाधिकाऱ्यांनी आंदोलनाचा निर्धार व्यक्त केला. त्यांनी सांगितले की, कारखान्याच्या आर्थिक परिस्थितीमुळे सन २०११-१२ ते २०१८-१९ या सलग आठ वर्षाच्या कालावधीत गळीत हंगाम बंद राहिला. त्यामुळे या काळात कामगारांचे वेतन, अन्य कायदेशीर देणी रखडली. संघटनेने वारंवार पत्रव्यवहार करून थकीत रक्कम देण्याची मागणी केली; मात्र आश्वासनांपलीकडे प्रत्यक्ष कार्यवाही झाली नाही. पीएफ आणि ग्रॅच्युइटीसारखी आयुष्यभराची पुंजी अडकून पडल्याने सेवानिवृत्त तसेच कार्यरत कामगारांची आर्थिक कोंडी झाली आहे. तातडीने हा प्रश्न सोडवावा, अन्यथा आंदोलन केले जाईल, असा इशारा कामगार संघटनेने कार्यकारी संचालकांना दिला आहे.


















