पुणे : भीमा पाटस सहकारी साखर कारखान्याची प्रारूप मतदार यादी आज होणार जाहीर

पुणे : दौंड तालुक्यातील भीमा-पाटस सहकारी साखर कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणुकीचे बिगुल अखेर वाजले आहे. त्यानुसार निवडणूक निर्णय अधिकारी तथा पुणे प्रादेशिक साखर सहसंचालक डॉ. प्रगती बागल यांनी कारखान्याच्या मतदारांची प्रारूप मतदार यादी बुधवारी (दि. १९) प्रसिद्ध करण्याबाबतच्या सूचना कारखान्याच्या प्रशासकांना दिलेल्या आहेत. त्यानुसार प्राथमिक मतदार यादी जाहिर करून सूचना-हरकती प्रक्रियेनंतर अंतिम करण्यात येणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.

दौंड तालुक्याच्या राजकारणाचा मुख्य केंद्रबिंदू हा भीमा-पाटस सहकारी साखर कारखाना राहिलेला आहे. कारखान्याच्या निवडणुकीवरून मागील काही वर्षे दोन गटात सातत्याने रणकंदन सुरू राहिलेले आहे. त्यामध्ये कारखान्याचे अध्यक्ष व भाजपचे आमदार राहुल कुल विरुद्ध माजी आमदार रमेश थोरात यांच्यात पुन्हा एकदा सामना रंगण्याची चिन्हे आहेत. यातून महायुतीचे घटक असलेल्या भारतीय जनता पक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटातील रणांगण हे जिल्ह्यातील भीमा सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीवरून दिसण्याची चिन्हे आहेत. त्यामुळे ही लढत पुढे जाऊन कशी रंगत घेणार हे चित्र लवकरच स्पष्ट होऊ शकेल.

ChiniMandi WhatsApp Channel

मतदारांना या प्रारूप मतदार यादीवर हरकती अथवा आक्षेप हे २८ ऑगस्ट पर्यंत प्रादेशिक साखर सहसंचालक पुणे येथे (साखर संकुल, पहिला मजला, शिवाजीनगर, पुणे) ई-मेलवर rjdpune.election @gmail.com वर पाठवायच्या आहेत. दाखल हरकती अथवा आक्षेपावर सुनावणी घेऊन दिनांक ७ सप्टेंबर २०२६ पर्यंत निर्णय घेतले जाणार आहेत. त्यानंतर कारखान्यांच्या मतदारांची अंतिम मतदार यादी ही ११ सप्टेंबर २०२६ रोजी प्रसिद्ध केली जाणार असल्याचे सांगण्यात आले.

Bioenergy Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here