पुणे : महाराष्ट्र शासन कृषी विभाग, कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा) व पाणी फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने शेतकऱ्यांना विविध पिकांच्या आधुनिक उत्पादन तंत्रज्ञानाची माहिती मिळावी तसेच शेती विषयक अडचणी व शंकांचे निरसन व्हावे यासाठी ‘डिजिटल शेतीशाळा’ हा उपक्रम राबविण्यात येत आहे. यामध्ये जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी सहभाग नोंदविण्यासाठी कृषी विभाग आत्माच्या माध्यमातून तालुका कृषि अधिकारी शरद धर्माधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली प्रचार प्रसिद्धी, गावा गावात शेतीशाळेचे थेट प्रक्षेपण आयोजित करण्यात येत आहे.
डिजिटल शेतीशाळेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना पिकांची लागवड, सुधारित उत्पादन तंत्रज्ञान, पीक व्यवस्थापन, खत व पाणी व्यवस्थापन, कीड व रोग नियंत्रण, तसेच उत्पादनवाढीसाठी आवश्यक विविध बाबींवर तज्ज्ञांकडून मार्गदर्शन करण्यात येते. विशेष म्हणजे शेतकऱ्यांना त्यांच्या शेतावरूनच डिजिटल माध्यमातून या शेतीशाळेत सहभागी होता येत असल्याने वेळ व खर्चाची बचत होत आहे.सोमवार ते शनिवार या कालावधीत दररोज वेगवेगळ्या पिकांवर आधारित शेतीशाळा आयोजित केली जाते. संबंधित पिकाच्या हंगामानुसार आवश्यक तांत्रिक मार्गदर्शन शेतकऱ्यांना दिले जाते. तसेच शेतीशाळेसाठी तज्ज्ञांसमोर मांडण्याची आणि त्यांच्या शंकांचे थेट निरसन करून घेण्याची संधी उपलब्ध करून देण्यात येते.


















