लातूर : निळकंठेश्वर सहकारी साखर कारखाना सुरू करण्यासाठी अनेक अडचणींचा सामना करावा लागला. कारखान्याची आर्थिक परिस्थिती आणि मालमत्तेवरील कर्जाचा बोजा यामुळे अडचणी निर्माण झाल्या होत्या. मात्र, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सहकार्यामुळे कारखाना पुन्हा सुरू करणे शक्य झाले. आगामी काळात उपपदार्थ निर्मितीच्या माध्यमातून शेतकऱ्यांना अधिक ऊसदर देण्याचा प्रयत्न राहील, असे प्रतिपादन आमदार अभिमन्यू पवार यांनी केले. कारखान्याच्या गळीत हंगामाचा प्रारंभ गुरुवारी महेश महाराज माकणीकर यांच्या हस्ते झाला. यावेळी ते बोलत होते.
कार्यक्रमात मागील गळीत हंगामात सर्वाधिक ऊस पुरवठा करणारे महादेव दादाराव भोसले (मालोजा), मुरलीधर मारुती लोमटे (येळष्ट), ज्ञानेश्वर विक्रम मनाळे (सरो), राम मारुती माने आणि राम विश्वंभर गांजनखेडे पवार (करजगाव) या शेतकऱ्यांचा सन्मान करण्यात आला. या वेळी महेश महाराज माकणीकर म्हणाले, की सध्याच्या काळात अनियमित पाऊस आणि पिकांची घटती उत्पादकता यामुळे शेतकरी अडचणीत आहेत. अशा परिस्थितीत पारंपरिक शेतीसोबत आधुनिक तंत्रज्ञान आणि कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर करण्याबाबत शेतकऱ्यांनी अभ्यास करावा. विज्ञान आणि तंत्रज्ञानाची मदत घेऊन शेतीत प्रगती साधावी. सभापती चंद्रशेखर सोनवणे, संतोष मुक्ता, काकासाहेब मोरे, परीक्षित पवार, कार्यकारी संचालक डी. एल. पतंगे, प्रकाश पाटील, शरद भोसले, सतीश भोसले, गुलाब शिंदे, गोविंद भोसले, शरद भोसले, सतीश भोसले, राम पाटील, गौरीशंकर बालकुंदे, बंकट पाटील, नाना धुमाळ, बळीराम पाटील, ओम बिराजदार, परमेश्वर धुमाळ, सिद्धेश्वर बालकुंदे आदी उपस्थित होते.


















