नवी दिल्ली : भारत सरकारने गहू आणि ड्युरम गव्हाच्या निर्यातीवरील निर्बंध तातडीने हटवले आहेत. यासोबतच गव्हाचे पीठ, आटा आणि मैदा यांसह संबंधित उत्पादनांच्या निर्यातीवरील निर्बंधही हटवण्यात आले आहेत. वाणिज्य मंत्रालयाच्या अंतर्गत येणाऱ्या परकीय व्यापार महासंचालनालयाने (DGFT) सोमवारी यासंदर्भात दोन स्वतंत्र अधिसूचना जारी केल्या.
DGFT ने निश्चित केलेल्या ITC (HS) कोड अंतर्गत गव्हाच्या निर्यात धोरणात बदल करण्यात आला आहे. यापूर्वी ‘प्रतिबंधित’ असलेली निर्यात आता ‘मुक्त’ करण्यात आली आहे.24 ऑगस्ट रोजी जारी केलेल्या अधिसूचना क्रमांक 35/2026-27 नुसार हा बदल तातडीने लागू झाला आहे. यामध्ये ITC (HS) कोड 10011900 अंतर्गत येणारा ड्युरम गहू आणि 10019910 अंतर्गत येणारा गहू यांचा समावेश आहे. या दोन्ही प्रकारच्या गव्हाची निर्यात यापूर्वी प्रतिबंधित होती. आता त्यांना मुक्त निर्यात श्रेणीत टाकण्यात आले आहे.
तसेच स्वतंत्र अधिसूचनेद्वारे सरकारने ITC (HS) कोड 11010000 अंतर्गत येणाऱ्या गव्हाच्या पिठाच्या आणि संबंधित उत्पादनांच्या निर्यातीवरील निर्बंधही हटवले आहेत.या श्रेणीत गव्हाचे किंवा मेस्लिनचे पीठ (आटा), मैदा, रवा/सूजी, संपूर्ण गव्हाचे पीठ आणि परिणामी पीठ यांचा समावेश आहे.या उत्पादनांची निर्यात धोरणेही तातडीने ‘प्रतिबंधित’वरून ‘मुक्त’ करण्यात आली आहेत.यासंदर्भातील अधिसूचना क्रमांक 34/2026-27 DGFT ने 24 ऑगस्ट रोजी जारी केली.
दोन्ही अधिसूचना वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयाच्या वाणिज्य विभागाने जारी केल्या असून, त्यांची अंमलबजावणी तातडीने सुरू झाली आहे.या निर्णयामुळे निश्चित HS कोडअंतर्गत येणारा गहू, गव्हाचे पीठ, आटा, मैदा आणि संबंधित उत्पादनांची निर्यात आता प्रतिबंधित श्रेणीत राहणार नाही. त्यामुळे या उत्पादनांना आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत निर्यात करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.


















