सोलापूर : येथील श्री सिद्धेश्वर सहकारी साखर कारखान्याने सभासदांसाठीच्या साखरेचे वाटप अचानक बंद केल्याने गोंधळ उडाला. कारखान्याच्या या निर्णयाबाबत सभासदांनी तीव्र संताप व्यक्त करून कारखान्याचे गेट बंद करून ठिय्या आंदोलन केले. साखर वाटपाबाबत योग्य निर्णय होईपर्यंत आंदोलन सुरू ठेवण्याचा इशारा सभासदांनी दिला आहे.
श्री सिद्धेश्वर साखर कारखान्याच्या कार्यस्थळावर सभासदांना साखर वाटप करण्याची प्रक्रिया सोमवारी अचानक बंद करण्यात आली. कारखाना प्रशासनाच्या या कृतीमुळे अनेक सभासदांनी नाराजी व्यक्त केली. कारखान्याच्या गेटसमोर सभासदांनी एकत्र येत ठिय्या आंदोलन सुरू केल्याने काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले. कारखाना प्रशासनाने याबाबत तातडीने निर्णय घेऊन सभासदांना साखर वाटप सुरू करावे, अशी मागणी आंदोलनकर्त्यांनी केली. सभासदांच्या मागण्यांबाबत प्रशासनाने सकारात्मक भूमिका घेऊन तोडगा काढावा, अशी मागणी करण्यात येत आहे.


















