सोलापुरातील ऊसदराचा तिढा अखेर सुटला; शेतकऱ्यांना मिळणार प्रतिटन ३,४५० रुपये

सोलापूर : गेल्या काही दिवसांपासून सोलापूर जिल्ह्यात सुरू असलेल्या ऊसदराच्या संघर्षाला अखेर तोडगा निघाला आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटनेने पुकारलेल्या आंदोलनाला आणि २४ नोव्हेंबरपासून महामार्ग रोको व रेल्वे रोको आंदोलन करण्याच्या इशाऱ्याला साखर कारखानदारांनी प्रतिसाद दिला आहे. यंदाच्या गाळप हंगामासाठी शेतकऱ्यांना पहिली उचल प्रतिटन ३,२५० रुपये आणि त्यानंतर प्रत्येकी १०० रुपयांचे दोन हप्ते, असे एकूण ३,४५० रुपये देण्यास कारखानदारांनी सशर्त सहमती दर्शविली आहे. यासंदर्भातील लेखी पत्र रविवारी (२२ नोव्हेंबर) कारखानदारांनी स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडे सुपूर्द केले.

गेल्या आठवड्यापासून स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक राजू शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली जिल्ह्यात ऊसदरासाठी आंदोलन सुरू होते. संघटनेने पहिली उचल प्रतिटन ३,५०० रुपये देण्याची मागणी केली होती. मात्र, साखर कारखानदार प्रतिटन ३,१०० रुपये दरावर ठाम होते.ऊसदराच्या प्रश्नावर तोडगा काढण्यासाठी बुधवारी (ता. १८) पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या उपस्थितीत सोलापुरात साखर कारखानदार आणि शेतकरी संघटनांच्या प्रतिनिधींची बैठक झाली. या बैठकीत पालकमंत्र्यांनी पहिली उचल ३,२५० रुपये आणि त्यानंतर प्रत्येकी १०० रुपयांचे दोन हप्ते देण्याचा प्रस्ताव मांडला. मात्र, कारखानदारांनी या प्रस्तावावर तत्काळ सहमती न दर्शवता निर्णय घेण्यासाठी दोन दिवसांची मुदत मागितली होती.

ChiniMandi WhatsApp Channel

चार दिवस उलटूनही कारखानदारांकडून अंतिम निर्णय जाहीर न झाल्याने स्वाभिमानी शेतकरी संघटनेने आंदोलन तीव्र करण्याचा निर्णय घेतला. २४ नोव्हेंबरपासून जिल्ह्यात महामार्ग रोको आणि रेल्वे रोको आंदोलन करण्याचा इशारा संघटनेने दिला होता.या पार्श्वभूमीवर शनिवारी (ता. २१) जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीच्या निमित्ताने टेंभुर्णी येथे एकत्र आलेल्या साखर कारखानदारांची बैठक झाली. रात्री उशिरापर्यंत माजी आमदार बबनदादा शिंदे, आमदार अभिजित पाटील, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष विजय रणदिवे, पंढरपूर तालुकाध्यक्ष सचिन पाटील आणि इतर पदाधिकाऱ्यांमध्ये सविस्तर चर्चा झाली. त्यानंतर प्रस्तावित दराच्या सूत्रावर एकमत झाले. रविवारी कारखानदारांनी या निर्णयाचे अधिकृत लेखी पत्र संघटनेकडे दिले. त्यामुळे ऊसदराचा प्रश्न निकाली निघाला असून, जिल्ह्यातील साखर कारखान्यांचा गाळप हंगाम सुरू राहण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

तिसऱ्या हप्त्यासाठी कारखानदारांची अट

ठरलेल्या निर्णयानुसार शेतकऱ्यांना पहिल्या टप्प्यात प्रतिटन ३,२५० रुपये, दुसऱ्या टप्प्यात १०० रुपये आणि तिसऱ्या टप्प्यात आणखी १०० रुपये मिळणार आहेत. अशा प्रकारे एकूण प्रतिटन ३,४५० रुपये दर निश्चित करण्यात आला आहे.मात्र, शेवटचा १०० रुपयांचा हप्ता देण्यासाठी कारखानदारांनी अट घातली आहे. संबंधित साखर कारखान्याचा साखर उतारा किमान १०.५० टक्के असावा किंवा साखरेचा विक्रीदर प्रतिकिलो ४५ रुपयांपेक्षा अधिक असावा, अशी अट प्रस्तावात नमूद करण्यात आली आहे.

शेतकऱ्यांच्या एकजुटीचा विजय : विजय रणदिवे

स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे सोलापूर जिल्हाध्यक्ष विजय रणदिवे म्हणाले, “सर्व शेतकऱ्यांनी एकजुटीने संघर्ष केल्यामुळेच हा विजय मिळवता आला आहे. आता कारखानदारांनी दिलेल्या आश्वासनानुसार शेतकऱ्यांना उसाचे पैसे अदा करावेत. यापुढेही शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांवर अशीच एकजूट कायम ठेवून संघर्ष सुरू ठेवणार आहोत.”

Bioenergy Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here