कोल्हापूर : आडसाली उसाचा कालावधी सर्वाधिक म्हणजे सुमारे १६ ते १८ महिने असतो. या हंगामातील लागवड साधारणपणे जुलै-ऑगस्ट महिन्यात केली जाते. या पिकाचा वाढीचा कालावधी मोठा असल्यामुळे तणांचा प्रादुर्भावही अधिक प्रमाणात दिसून येतो. विशेषतः लागवडीनंतरच्या सुरुवातीच्या तीन ते चार महिन्यांत उसाची वाढ तुलनेने संथ असते, तर तणे ही अतिशय वेगाने वाढून पाणी, अनद्रव्य, सूर्यप्रकाश आणि जागेसाठी पिकाशी तीव्र स्पर्धा करतात. त्यामुळे उसाची वाढ खुंटते. तणांचे वेळेवर नियंत्रण न केल्यास उस उत्पादनात ३० ते ७० टक्क्यांपर्यंत घट होऊ शकते. शेतकऱ्यांनी याकडे अधिक लक्ष देण्याची गरज असल्याचे मत वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटमधील तज्ज्ञ डॉ. अभिनंदन पाटील, प्रणाली ढेकाणे, डॉ. अशोक कडलग यांनी व्यक्त केले आहे.
याबाबत कृषी तज्ज्ञांच्या मते, ऊस पिकामध्ये लागवडीनंतरचे पहिले ९० ते १२० दिवस (३ ते ४ महिने) हा तण नियंत्रणाच्या दृष्टीने सर्वाधिक संवेदनशील कालावधी मानला जातो. या कालावधीत उसाची वाढ तुलनेने मंद असते, तर तणे जलद गतीने वाढून पिकाशी पाणी, अन्नद्रव्य, सूर्यप्रकाश आणि जागेसाठी स्पर्धा करतात. त्यामुळे या काळात तणांचे प्रभावी व्यवस्थापन केल्यास उत्पादनात होणारी घट मोठ्या प्रमाणात टाळता येते. अलीकडील काळात खांडकुळी या वेलवर्गीय तणाचा प्रादुर्भाव अनेक भागांत वाढताना दिसून येत आहे. हे तण उसाच्या बांधणीनंतर कांड्यावर चढून पानांभोवती विळखा घालते. त्यामुळे पानांना पुरेसा सूर्यप्रकाश मिळत नाही, आडसाली उसामध्ये आढळणारी प्रमुख तपणे आडसाली ऊस पिकामध्ये दीर्घ वाढीच्या कालावधीमुळे गवतवर्गीय, रुंद पानांची, लव्हाळा तसेच वेलवर्गीय तणांचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात आढळतो. हे तण अन्नद्रव्यांसाठी मुख्य ऊस पिकासोबत तीव्र स्पर्धा करतात.
तण उसाच्या मुळांमधून अन्नद्रव्ये व पाणी शोषून घेत असल्याने पिकाची वाढ मंदावते. त्यामुळे योग्य तणनाशकाची निवड, शिफारशीनुसार मात्रा योग्य वेळी फवारणी तसेच वेळेवर खुरपणी, आंतरमशागत आणि योग्य सिंचन व्यवस्थापन यांचा समन्वय साधणे आवश्यक आहे. तणांचा प्रादुर्भाव झाल्यानंतर त्याची तीव्रता कमी करण्यासाठी भौतिक, जैविक आणि रासायनिक या तिन्ही प्रमुख पद्धती वापराव्यात. मात्र, तणनाशकाच्या अतिवापरामुळे परिणाम होऊ शकतात. मातीतील उपयुक्त सूक्ष्मजीवांचे नुकसान होऊ शकते. एकाच तणनाशकाचा वारंवार वापर केल्यास तणांमध्ये तणनाशक प्रतिकारशक्ती विकसित होण्याचा धोका वाढतो. त्यामुळे तणनाशकांची फेरपालट आणि योग्य मिश्रणाचा वापर करणे आवश्यक आहे, असे तज्ज्ञांनी सांगितले.


















