नाशिक : गेल्या दशकाहून अधिक काळ आर्थिक आणि प्रशासकीय अडचणींमध्ये सापडलेल्या नाशिक सहकारी साखर कारखान्याला (नासाका) तीन वर्षांपूर्वी पुन्हा सुरुवात मिळाली होती. मात्र, कारखाना चालविण्याची जबाबदारी घेतलेल्या पुण्यातील कंपनीने अवघ्या दोन वर्षांत काढता पाय घेतल्याने ‘नासाका’समोरील संकट पुन्हा गडद झाले आहे. यंदाच्या गळीत हंगामात कारखान्याचा बॉयलर पेटण्याची शक्यता कमी झाल्याने कार्यक्षेत्रातील ऊस उत्पादक शेतकरी चिंतेत आहेत. याबाबतचे वृत्त ‘महाराष्ट्र टाईम्स’ने दिले आहे.
बातमीत म्हटले आहे कि, कारखान्याचे सुमारे १४ लाख रुपयांचे वीजबिल थकीत असल्याने महावितरणने गेल्या चार महिन्यांपासून वीजपुरवठा खंडित केला आहे. याशिवाय जिल्हा मध्यवर्ती बँकेचीही मोठी रक्कम थकीत आहे. करारानुसार साखरेच्या प्रत्येक पोत्यामागे १०१ रुपये या प्रमाणात दोन गळीत हंगामांची कोट्यवधी रुपयांची रक्कम जिल्हा बँकेला मिळणे अपेक्षित होते. मात्र, ही रक्कम अदा न झाल्याने बँकेने संबंधित कंपनीला करार रद्द करण्याची नोटीस बजावली आहे.
३००१ रुपयांचा दर जाहीर; शेतकऱ्यांचा भ्रमनिरास
सप्टेंबर २०२५ मध्ये पुण्याचे प्रसाद घावटे यांनी ‘नासाका’ चालविण्याची जबाबदारी घेतल्यानंतर उसाला ३,००१ रुपये प्रतिटन दर जाहीर केला होता. मात्र, प्रत्यक्षात सर्व शेतकऱ्यांना या दरानुसार पैसे मिळाले नसल्याचा आरोप आहे. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये नाराजी निर्माण झाली असून, कारखाना पुन्हा आर्थिक संकटात सापडल्याने शेतकरी आणि कामगार संतप्त झाले आहेत.
मालमत्ता जप्तीचे आदेश
‘नासाका’ सध्या अष्टलक्ष्मी शुगर, इथेनॉल अँड एनर्जी लिमिटेड या कंपनीला भाडेतत्त्वावर चालविण्यास देण्यात आला आहे. माजी खासदार हेमंत गोडसे यांच्या पुढाकारातून तीन वर्षांपूर्वी कारखाना सुरू झाला होता. त्यानंतर गेल्या वर्षी कारखाना पुण्याचे प्रसाद घावटे यांच्या ताब्यात देण्यात आला. घावटे यांच्या काळात सुमारे ६० हजार ३०४ मेट्रिक टन उसाचे गाळप झाले. मात्र, त्यानंतर कारखान्याची आर्थिक स्थिती बिघडल्याचा आरोप करण्यात येत आहे. शेतकरी, कामगार, पुरवठादार आणि सुरक्षा कर्मचाऱ्यांची देणी थकीत असल्याने कारखान्याच्या व्यवस्थापनावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
शेतकऱ्यांनी प्रशासनाकडे तक्रारी केल्यानंतर साखर आयुक्त डॉ. संजय कोलते यांच्यासमोर चार वेळा सुनावणी झाली. त्यानुसार, एफआरपी २,१८९.५० रुपये प्रतिटन या दराने शेतकऱ्यांना १३ कोटी २० लाख ३७ हजार रुपये देणे अपेक्षित होते. त्यापैकी कारखान्याने १० कोटी ५८ लाख २९ हजार रुपयांची देणी अदा केली. मात्र, उर्वरित २ कोटी ६२ लाख ८ हजार रुपयांची देणी अद्याप अदा करण्यात आलेली नाहीत. साखर आयुक्तांनी ही रक्कम १५ टक्के व्याजासह भरण्यासाठी १५ मे ही अंतिम मुदत दिली होती. कारखान्याने ही मुदतही पाळली नाही.यानंतर साखर आयुक्तांनी २५ जून रोजी कंपनीची मालमत्ता जप्त करण्याचे आदेश दिले. या कारवाईसाठी नाशिक जिल्हाधिकाऱ्यांची प्राधिकृत अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
माजी खासदार हेमंत गोडसे यांचा आरोप
माजी खासदार हेमंत गोडसे यांनी ‘महाराष्ट्र टाइम्स’शी बोलताना आरोप केला की, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे व्याही विठ्ठल कदम यांच्या सांगण्यावरून इच्छा नसतानाही गेल्या वर्षी पुण्याचे प्रसाद घावटे यांना नाशिक साखर कारखाना चालविण्यास देण्यात आला. मात्र, त्यांनी कारखान्याची आर्थिक स्थिती बिघडवली, असा आरोप गोडसे यांनी केला.
जिल्हा बँकेची रक्कम थकीत
नासाका भाडेतत्त्वावर चालविणाऱ्या कंपनीने जिल्हा बँकेची देणी अद्याप अदा केलेली नाहीत. २८ ऑगस्टपर्यंत थकीत रक्कम न भरल्यास कंपनीसोबतचा नासाका भाडेतत्त्वाचा करार रद्द केला जाईल, असा इशारा देण्यात आल्याचे ‘नासाका’चे प्रशासक संतोष बिडवई यांनी सांगितले. नासाका पुन्हा आर्थिक संकटाच्या भोवऱ्यात सापडला असून, यंदाचा गळीत हंगाम सुरू होणार की नाही, याकडे शेतकरी आणि कामगारांचे लक्ष लागले आहे.


















