पुणे: श्री सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याची अंतिम मतदार यादी नुकतीच प्रसिद्ध झाल्यानंतर निवडणूक प्रक्रियेला वेग आला आहे. त्यामुळे विविध राजकीय गटांनीही आपापली मोर्चेबांधणी सुरू केली असून, इच्छुक उमेदवारांनी सभासदांच्या गाठीभेटींवर भर दिला आहे. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या कार्यकर्त्यांनी विविध गावांमध्ये घोंगडी बैठका आयोजित करून कारखान्याच्या सभासदांशी थेट संवाद साधण्यास सुरुवात केली आहे. निवडणूक बिनविरोध होणार की विविध राजकीय गट स्वतंत्रपणे मैदानात उतरणार, याबाबत सभासदांमध्ये उत्सुकता निर्माण झाली आहे. भाजप, दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना तसेच स्थानिक गटांच्या भूमिकेकडेही कारखाना कार्यक्षेत्रातील सभासदांचे लक्ष लागले आहे.
पक्षाचे युवा नेते युगेंद्र पवार यांनी काही दिवसांपूर्वी पक्षप्रवेशाच्या निमित्ताने मुरूम येथे आयोजित मेळाव्यात तसेच निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सभासदांशी साधलेल्या संवादातून कारखाना निवडणुकीत सक्रिय भूमिका घेण्याचे संकेत दिले होते. एकीकडे बिनविरोध निवडणुकीची चर्चा सुरू असतानाच दुसरीकडे विविध गावांमध्ये सुरू झालेल्या बैठका आणि संपर्क मोहिमांमुळे सोमेश्वर कारखान्याच्या निवडणुकीचा रणसंग्राम हळूहळू रंगू लागल्याचे चित्र आहे. आगामी निवडणुकीचा बिगुल वाजल्यानंतर कारखाना कार्यक्षेत्रातील राजकीय हालचालींना वेग आला आहे. मुरूम, वाणेवाडी, करंजे, शेंडकरवाडी, मगरवाडी, वाकी, चौधरवाडी आणि खंडोबाचीवाडी या गावांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार गटातर्फे नुकत्याच बैठका घेण्यात आल्या. या संपर्क मोहिमेत राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष राजेंद्र जगताप, माजी पुणे जिल्हा परिषद सभापती दत्ता चव्हाण, माजी पुणे जिल्हा परिषद अध्यक्ष सतीश खोमणे, प्रदीप गीते, अनिल शहा, प्रवीण भोसले, प्रदीप शेंडकर, सागर मदने, निवृत्ती शेंडकर, केतन भोसले, शशीभाऊ काकडे, राजेंद्र लकडे यांच्यासह पदाधिकारी संवाद साधत आहेत.


















