सोलापूर: ग्रॅच्युईटीची रक्कम आणि शिल्लक रजांचा पगार मिळावा या मागणीसाठी संत दामाजी सहकारी साखर कारखान्याच्या निवृत्त कामगारांनी कारखान्याच्या प्रवेशद्वारावर आंदोलन सुरू केले आहे. गेल्या १३ दिवसांपासून हे आंदोलन सुरू आहे. त्यावर कारखाना प्रशासनाने तोडगा काढावा, अशी मागणी करण्यात येत आहे. एकूण देयकांपैकी सध्या किमान ४० टक्के रक्कम द्यावी व राहिलेली रक्कम एका वर्षात त्यांना द्यावी. याचा निर्णय तातडीने घेणे आवश्यक आहे. याबाबत कारखान्याने पुढाकार घ्यावा अशी मागणी अॅड. दत्तात्रय खडतरे यांनी केली आहे. कामगारांनी आपल्याला ग्रॅच्युइटीची रक्कम मिळाली नसल्याचे, तसेच स्वेच्छानिवृत्ती घेतलेल्या कामगारांना कारखाना प्रशासनाने काढलेल्या परिपत्रकाप्रमाणे सेवानिवृत्तीचा लाभ मिळाला नाही. शिल्लक रजेचा पगार मिळाला नाही, या प्रमुख मागण्यांसह इतरही मागण्या प्रलंबित असल्याचे सांगितले.
यावेळी अॅड. खडतरे यांनी कारखानास्थळावरील आंदोलनातील निवृत्त कामगारांशी चर्चा करून त्यांच्या मागण्या जाणून घेतल्या. यापूर्वीचे संचालक मंडळ चांगले काम करत नव्हते म्हणून या समविचारी आघाडीच्या विद्यमान संचालक मंडळाला निवडून दिले. सर्व नेत्यांनी याकडे लक्ष घालून तोडगा काढावा, असे आवाहन अॅड. खडतरे यांनी केले. यावेळी कारखान्याचे लेखापरीक्षक ज्ञानेश्वर भंडगे, सेवानिवृत्त कृषी अधिकारी शशिकांत रोकडे आदी उपस्थित होते. दरम्यान, कारखान्याचे अध्यक्ष शिवानंद पाटील म्हणाले की, एक कामगार सेवानिवृत्त झाल्यानंतर जवळपास १० लाख रुपये द्यावे लागतात. सध्या सात कोटींचा फंड भरला आहे. २.५ कोटी रुपये थकीत देणी दिली आहेत. सर्व सेवानिवृत्त कामगारांची सर्व थकीत देणी टप्प्याटप्याने देणार आहे.


















